तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला प्रारंभ
जुना रस्ता उकरून नूतनीकरण, कामात पावसाचा अडथळा : दुसरे रेल्वेगेट मार्गे वाहतूक वळविल्याने कोंडी
बेळगाव : तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्यावर खड्डे पडल्याने सर्वच स्तरातून प्रशासनावर टीका झाल्यानंतर आता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी सकाळपासून खचलेला रस्ता खणून त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. यामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक वळविण्यात आली होती. वाहतूक दुसरे रेल्वेगेट मार्गे वळविल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. पावसाळ्याच्या दिवसात तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावर अनेक ठिकाणी खड्डे पडले. बेळगावच्या नागरिकांनी बऱ्याचवेळा तक्रारी मांडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करण्यात आली. परंतु, मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे पुन्हा एकदा उड्डाणपुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
बेळगाव शहरातून उद्यमबाग, मजगाव येथील औद्योगिक वसाहतीला ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना उड्डाणपुलावर अपघातांना सामोरे जावे लागत होते. याची दखल घेऊन बुधवारपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. उड्डाणपूल काही ठिकाणी खचून खड्डे पडले होते. त्यामुळे खचलेला रस्ता उकरून काढून त्या ठिकाणी आता नवा रस्ता केला जाणार आहे. बुधवारी सकाळपासून रेल्वेच्यावतीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असली तरी परतीच्या पावसाने दुरुस्तीच्या कामावर मर्यादा येत आहेत. परंतु, दुसरे रेल्वेगेट परिसरात होणारी गर्दी पाहता उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
अनगोळ नाका, दुसरे रेल्वेगेट येथे बॅरिकेड्स
उड्डाणपुलावरील रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने अनगोळ नाका, तसेच दुसरे रेल्वेगेट येथे बॅरिकेड्स लावण्यात आले. उड्डाणपुलावरून वाहतूक बंद केल्याने ती वाहतूक अनगोळ नाका मार्गे दुसरे रेल्वेगेट येथे वळविण्यात आली. त्याचबरोबर दुसरे रेल्वेगेटजवळील काँग्रेस रोड येथे रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला होता.