रेणुका यल्लम्मा देवस्थान विकास प्राधिकरण लवकरच स्थापन
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विधेयक संमत : विकासाला चालना
बेंगळूर : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती रेणुका यल्लम्मा देवस्थान विकास प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. यासंबंधी पहिवहन आणि धर्मादाय खात्याचे मंत्री रामलिंगारेड्डी यांनी विधानसभेत 2024 सालातील रेणुका यल्लम्मा देवस्थान विकास प्राधिकरण विधेयक मांडले. विधानपरिषदेतही हे विधेयक सादर करण्यात आले. नंतर ते सर्वानुमते संमत करण्यात आले. विधेयकाविषयी विधानसभेत बोलताना मंत्री रामलिंगारेड्डी यांनी, यल्लम्मा मंदिराला कर्नाटकासह गोवा, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगण राज्यांतून दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे रेणुका यल्लम्मा देवस्थान विकास व निर्माण कामे हाती घेण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण रचनेसाठी तरतूद केली जाणार आहे. राज्यस्तरावरील एक समिती, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील आणखी एक समिती काम करणार आहे. प्राधिकरण स्थापनेमुळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी माहिती दिली.
मंत्री रामलिंगारेड्डी यांनी मागील वर्षभरात चामुंडी टेकडी, घाटी सुब्रह्मण्य क्षेत्रा, हुलिगेम्मा क्षेत्र प्राधिकरणांची स्थापना केली आहे. आता श्री रेणुका यल्लम्मा क्षेत्र प्राधिकरण स्थापन केले जाणार आहे. सौंदत्ती येथील यल्लम्मा मंदिर राज्याच्या धर्मादाय खात्यातील ‘अ’ श्रेणीत येते. एकूण 88.37 एकर विस्तीर्ण परिसरात हे मंदिर आहे. श्री रेणुका यल्लम्मा पर्यटन विकास मंडळ अधिनियम आणि प्रस्तावित प्राधिकरणांच्या समन्वयाने मास्टर प्लान तयार करून भाविकांना आणखी अनुकूल करण्यात येणार आहे. रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. भाविकांना निवासाची सोय, दर्शन, प्रसाद वाटपाची सुविधा पुरविण्यात येईल. परिणामी मंदिराच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. पर्यटनालाही चालना देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.