रेणुका चषक हॉकी स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : फिनिक्स पब्लिक स्कूल व फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल आयोजित 27 व्या निमंत्रितांच्या 15 वर्षाखालील मुलींच्या रेणुका स्मृती चषक हॉकी स्पर्धेला शुक्रवारी शानदार प्रारंभ झाला. फिनिक्स शाळेच्या लेकव्यू हॉकी मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ थाटात पार पडला या कार्यक्रमाला महाकाली शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष विवेकराव पाटील,उत्तम शिंदे, सुधाकर चाळके, मुख्याध्यापिका सरफुनिसा सुभेदार,बाळू कांबळे,सविता वनसे, सचिन पवार, प्रशांत पडोळकर,महांतेश गवी,गणेश गोंधळी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वज व आकाशात कबुतरे उडवून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर सदर स्पर्धेत भाग घेतलेल्या हॉकी खेळाडूंची पाहुण्यांना ओळख करून देण्यात आली. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील क्रिएटिव हायस्कूल गडहिंग्लज, ताराराणी हायस्कूल खानापूर, सेंटजॉन हायस्कूल काकती, विजया इंटरनॅशनल, यजमान फिनिक्स पब्लिक स्कूल संघानी सहभाग घेतला आहे. उद्घाटनाच्या साखळी सामन्यात क्रिएटिव्ह गडहिंग्लज व ताराराणी खानापूर यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला, दुसऱ्या सामन्यात फिनिक्स संघाने सेंट जॉन काकती संघाचा 4-1 असा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात ताराराणी खानापूर संघाने विजया इंटरनॅशनल संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला.
आजचे उपांत्य फेरीचे सामने
- फिनिक्स विरुद्ध ताराराणी खानापूर सकाळी 10 वाजता
- सेंट जॉन काकती विरुद्ध क्रिएटिव्ह गडहिंग्लज सकाळी 11 वाजता