‘त्या‘ गाळेधारकांकडून सुरुवातीपासून भाडे आकारणार..!
निपाणी पालिकेकडून लोकमान्य टिळक उद्यानातील गाळेधारकांचा सर्व्हे सुरू : शुक्रवारी बैठकीचे आयोजन
निपाणी : लोकमान्य टिळक उद्यानात नगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या व्यापारी गाळ्यांचे आजतागायत पालिकेने भाडे आकारले नव्हते. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रात केवळ दुर्लक्षामुळे रखडला होता. यासंदर्भात ‘तरुण भारत’ने भाडे आकारणीकडे झालेल्या दुर्लक्षाविषयी सविस्तर वृत्त दिले होते. यामुळे डोळे उघडलेल्या पालिका प्रशासनाने आता व्यापारी गाळेधारकांकडून भाडे वसूल करण्यासाठी पावले उचलली आहेत. मंगळवारी यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यापारी गाळ्यांचा सर्व्हे केला. यानंतर शुक्रवारी सदर गाळेधारकांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील लोकमान्य टिळक उद्यान आवारात नगरपालिकेकडून 2016 मध्ये 55 ते 60 व्यापारी गाळ्यांची उभारणी झाली होती. यासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तत्कालीन नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांच्या कार्यकाळात सप्टेंबर 2017 मध्ये तत्कालीन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते सदर गाळ्यांचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर वर्षभराने विस्थापितांना गाळे ताब्यात दिले. मात्र त्यानंतर गाळेधारकांकडून भाडेवसुली झालीच नाही. सहा वर्षांच्या काळात प्रशासक तसेच सभागृह अस्तित्वात असतानाही पालिका पदाधिकाऱ्यांकडून भाडेवसुलीकडे दुर्लक्ष झाले.
काही गाळेधारकांनी नगरपालिकेकडे गाळ्याची अनामत रक्कम भरली आहे. मात्र नगरपालिकाच भाडे विचारत नसल्याने गाळेधारकांनीही भाडे देण्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी भाड्याची रक्कम वाढतच गेली. सुरुवातीपासून वेळेत भाडे आकारणी झाली असती तर नगरपालिकेने खर्च केलेला निम्मा निधी भाड्याच्या स्वरूपात पुन्हा पालिकेकडे आला असता. मात्र तितक्या गांभीर्याने काम करेल ते प्रशासन कसले? अखेर 2 ऑक्टोबर रोजी ‘तरुण भारत’ने सविस्तर वृत्त देत झालेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. यानंतर जागे झालेल्या पालिका प्रशासनाने प्रलंबित राहिलेले भाडे आकारण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार मंगळवारी पालिका अधिकाऱ्यांनी लोकमान्य टिळक उद्यान आवारात जाऊन गाळेधारकांची माहिती घेतली.
गाळेधारकांची माहिती घेताना मूळ गाळेधारक कोण आणि सध्या येथे गाळे चालवणारे कोण? याची माहिती घेतली जात आहे. यावेळी विस्थापित म्हणून सहानुभूतीच्या नावाखाली काहींनी गाळे घेऊन तो इतरांना भाड्याने दिल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी मूळ गाळेधारकाला सुरुवातीपासून भाडे भरण्याची नोटीस दिली जाणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी पालिका प्रशासनाकडून गाळेधारकांची बैठक बोलवण्यात आल्याचे समजते. या बैठकीत भाडे वसुलीसंदर्भात अंतिम निर्णय होणार आहे. सध्या लोकमान्य टिळक उद्यानातील गाळेधारकांची माहिती घेतली जात आहे. यात मूळ गाळेधारकांना सुरुवातीपासून भाडेवसुलीची नोटीस दिली जाणार आहे. लवकरच या गाळेधारकांची बैठक घेऊन भाडे निश्चित केले जाणार आहे.