टोलटो फेरीधक्क्यावरून ‘रेंट अ कार’ घुसली नदीत
कारमधील विद्यार्थिनी सुखरूप : बुडालेल्या युवकाचा शोध जारी ,गुगल मॅपने केला घात,शनिवारी मध्यरात्रीनंतरची घटना
वार्ताहर /माशेल
टोलटो (सांत इस्तेव्ह) ते धावजी (जुने गोवे) या फेरीबोटीच्या टोलटो फेरी धक्क्यावर ‘रेंट अ कार’ कारगाडी पाण्यात बुडाल्याने कारचालक बुडाल्याचा संशय क्यक्त करण्यात येत आहे. बाशुदेव भंडारी (22, रा. बरूच-गुजरात) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याबरोबर असलेली त्याची मैत्रिण (विद्यार्थिनी) सुखरूप बचावली आहे. अपघातात सापडलेल्या कारगाडीचा पाठलाग करणाऱ्यांपासून बचावासाठी घाईगडबडीत गुगल मॅपनुसार वळविण्यात आलेली ही कार टोलटो फेरीबोट धक्क्याजवळ थेट नदीत घुसल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी आढळले आहे.
मैत्रिणीला भेटायला आला अन्...
ओल्ड गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाशुदेव भंडारी हा तऊण आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गुजरातमधून गोव्यात आला होता. त्याची मैत्रिण सांखळी येथील मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. दोघेही रेंट अ कारने फिरत असताना ते मध्यरात्रीनंतर सांत इस्तेव्ह येथे पोहोचले. यावेळी पाठीमागून अन्य एक कारमधून कुणीतरी त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यांना आढळून आले होते.
गुगल मॅपने केला घात
बाशुदेवला कोणत्या रस्त्याने जावे हे कळेनासे झाले. त्यानंतर बाशुदेव याने गुगल मॅपची मदत घेत मिळेल तेथून निसटण्याचा प्रयत्न केला. त्या कारगाडीपासून लांब जाण्यासाठी निघालेले ते टोलटो सांत इस्तेव येथील फेरीबोट धक्क्यावर पोहोचले. काळोखात पुढे रस्ता आहे की नदी, याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात आलेली कार थेट नदीत गेली. बाशुदेव गाडीत अडकला, मात्र त्याच्या मैत्रिणीने गाडीतून बाहेर येत आपला जीव वाचवला.
सायंकाळपर्यंत शोध जारी
घटनेची माहिती मिळाल्यानंतर फोंडा, कुंडई, ओल्ड गोवा अग्निशामक दलाचे अधिकारी अजित कामत यांच्या टिमने महत्त्वाचे सहकार्य केले. पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर, कोस्टल पोलीस निरीक्षक अजित उमर्ये घटनास्थळी दाखल झाले आहे. ओल्ड गोवा पोलीस आणि मरिन पोलिसांकडून बुडालेल्या युवकाचा काल रविवारी सायंकाळपर्यंत शोध घेण्यात येत होता.ओल्ड गोवा पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू आहे. पाण्यातून बाहेर काढलेल्या रेंट अ कारमधून एक सुटकेस, दोन बॅग, 1 लॅपटॉप व किरकोळ साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी ओल्ड गोवा पोलीस अधिक तपास करीत आहे.