For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुविख्यात अभिनेत्री सरोजा देवींचे निधन

06:05 AM Jul 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
सुविख्यात अभिनेत्री सरोजा देवींचे निधन
Advertisement

161 चित्रपटांमध्ये नायिका : हा असाधारण विक्रम

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मागच्या पिढीतील सुविख्यात दक्षिण भारतीय अभिनेत्री बी. सरोजा देवी यांच्या वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी अनेक तामिळ, कन्नड, तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करुन आपल्या कौशल्याचा अमिट ठसा उमटविला आहे. सात दशकांहून अधिक मोठ्या अभिनयकाळात त्यांनी एकंदर 161 चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. आतापर्यंत भारतात कोणत्याही अभिनेत्रीने इतक्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा हा विक्रम आहे. त्यांनी एकंदर, 200 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

Advertisement

कन्नड भाषिकांमध्ये त्या ‘अभिनय सरस्वती’ म्हणून प्रसिद्ध होत्या. तर तामिळनाडूमध्ये त्यांचा उल्लेख ‘कन्नडाथू पैंगिली’ असा करण्यात येत असे. त्या मूळच्या कर्नाटकातील होत्या. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत यशस्वी नायिका असा गौरव त्यांना प्राप्त आहे. अनेक पुरस्काही त्यांनी मिळविले आहेत.

कन्नड ‘सुपरस्टार’ अभिनेत्री

कन्नड चित्रपट क्षेत्रातील प्रथम ‘सुपरस्टार’ अभिनेत्री म्हणून त्यांना मानले जात होते. 1955 मध्ये त्यांच्या वयाच्या 17 व्या वर्षी त्यांना ‘महाकवी कालीदास’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथम मोठे यश मिळाले. त्यानंतर अनेक दशके त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 1957 मध्ये त्यांनी ‘पांडुरंग महात्म्यम्’ या चित्रपटातून तेलगू चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. दक्षिणेतील तीन भाषा आणि हिंदी भाषा अशा चार  भाषांमध्ये त्यांनी एकाहून एक गाजलेले चित्रपट दिले होते. गेली काही वर्षे त्या वृद्धत्वामुळे होणाऱ्या विकारांमुळे प्रकृती अस्वास्थ्याच्या समस्यांना तोंड देत होत्या.

आणखी एक विक्रम

बी. सरोजा देवी यांच्या नावावर आणखी एक असाधारण विक्रम आहे. 1955 ते 1984 या 29 वर्षांच्या काळात त्यांनी सलग 161 चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका साकारल्या होत्या. कोणत्याही भारतीय अभिनेत्रीने आजपर्यंतच्या इतिहासात इतक्या चित्रपटांमध्ये सलगपणे नायिकेच्या भूमिका साकारलेल्या नाहीत. त्यांचा हा विक्रम दीर्घ कालावधीपर्यंत अबाधित राहील, अशी शक्यता आहे.

मान्यवरांना दु:ख

त्यांच्या निधनामुळे चित्रपट आणि इतर क्षेत्रांमधील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीतील एक देदिप्यमान पर्वाची समाप्ती झाली आहे. त्यांना तोड सापडणे कठीण आहे, अशा शब्दांमध्ये अनेक सर्वसामान्यांपासून दिग्गजांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Advertisement
Tags :

.