जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम जलदगतीने
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाचा वेगाने विकास करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विविध कामे हाती घेण्यात आली असून कार्यालयातील आतील भाग व आवारातही विविध कामे करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील पार्किंग समस्या नित्याचीच बनली होती. ही समस्या निकाली काढण्यासाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्थेच्या दृष्टीने काम हाती घेण्यात आले असून सपाटीकरण करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने कामे करण्यात येत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्व कामे जलदगतीने करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्याच्या फुटपाथ शेजारी संरक्षक भिंत काढण्यात आली असून तेथे सीसी बांधकाम करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लोखंडी पोर्च निर्माण करण्यात येत आहे. तसेच कार्यालयाला दगडी थर लावण्यात येत आहेत. कार्यालयाच्या आतील भागात विविध विभाग निर्माण करण्यात येत असून सदर कामे प्रगतीपथावर आहेत. टप्प्याटप्प्याने विविध कामे हाती घेण्यात येत असून कंत्राटदारांकडून जलदगतीने कामे पूर्ण करण्यात येत आहेत.