कला अकादमीचे नूतनीकरण दर्जाहीन
कामांच्या पाहणीनंतर कृतिदलाचे निरीक्षण : अध्यक्ष विजय केंकरेसह सर्व सदस्यांची नाराजी
पणजी : कला अकादमीचे नूतनीकरण व दुरुस्तीकामावर 50 कोटी पेक्षाही जास्त खर्च केल्यानंतरही संबंधित कामांचा दर्जा निम्नस्तरीय व दोषयुक्त राहिलेला आहे, असे पाहणीत दिसून आले आहे, अशी माहिती या कामांच्या दर्जाची पाहणी करण्यासंबंधी नियुक्त केलेल्या कृती दलाचे अध्यक्ष प्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे यांनी दिली. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दलाचे अन्य सदस्य उपस्थित होते. या समितीकडून सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस कला अकादमीची पाहणी करण्यात आली. त्यानंतर दलाकडून वरील निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
निम्नदर्जा, दर्जाहीन कामे
कला अकादमीच्या नूतनीकरण कामांचा दर्जा एकदम निम्नस्तरीय आहे. तपासणी दरम्यान काही कामे तर दर्जाहीन असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तज्ञांच्या सल्ल्याने ती कामे पुन्हा नव्याने हाती घ्यावी लागणार आहेत, असे मत केंकरे यांनी मांडले. सरकारकडून 50 कोटींपेक्षा जादा निधी खर्च करून कला अकादमीची दुरूस्ती आणि नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र या कामांच्या दर्जाबाबत प्रारंभापासूनच कलाप्रेमी आणि राजकीय विरोधकांकडून संशय व्यक्त करण्यात येत होता. तसेच हे दुरुस्तीकाम म्हणजे एक मोठा घोटाळा असल्याचा आरोपही अनेकदा करण्यात आला होता. तसेच सदर कामांच्या दर्जाची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली होती.
या सर्वांची दखल घेताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यीय कृतिदल स्थापन केले होते. त्यात प्रसिद्ध तियात्रिस्त तोमाझिन कार्दोज, नाट्याकर्मी देविदास आमोणकार, प्रवीण गांवकार, आदींचा समावेश होता. दोन दिवस कला अकादमीची पाहणी केल्यानंतर या कृतिदलाच्या सदस्यांनी बैठक घेऊन पाहणी, निरीक्षणाचा आढावा घेतला. त्यावेळी रंगमंचाची अव्यवस्था, चुकीच्या जागी स्थलांतरित करण्यात आलेली वातानुकुलन यंत्रणा, ध्वनी यंत्रणा आदींसह बहुतेक सर्वच कामांवर सदस्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता तज्ञांचा सल्ला घेऊन सदर दोषपूर्ण कामे पुन्हा नव्याने करावी लागणार आहेत, असे सूचविण्यात आले. त्यासंबंधी सदर कामे करणाऱ्या कंत्राटदारांसोबत येत्या दि. 10 नोव्हेंबर रोजी बैठक घेण्यात येईल, असे केंकरे यांनी सांगितले.