संशयित म्हणून हटकले, अन् निघाले अट्टल चोरटे!
निपाणीत दोघांकडून 10 दुचाकी जप्त : बसवेश्वर चौक पोलिसांची कारवाई : दुचाकी ठेवल्या होत्या निर्जनस्थळी लपवून
प्रतिनिधी/ निपाणी
बसस्थानक परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले अन् पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी तब्बल 10 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. शनिवारी बसवेश्वर चौक पोलिसांनी सदर कारवाई केली. जायीद जावेद बागवान (वय 20, रा. अमाते गल्ली, पोस्ट कार्यालयनजीक निपाणी) व अक्षय राजू शेलार (वय 23, रा. राजीव गांधी नगर, जयसिंगपूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. 29 जानेवारी रोजी श्रीपेवाडी येथील विजय धोंडीबा पोवार यांची दुचाकी निपाणी येथील अकोळ रोडवरील हालसिद्धनाथ मंदिरानजिकच्या आवारातून चोरीस गेली होती.
यासंदर्भात सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर दुचाकी न मिळाल्याने पोवार यांनी 6 मार्च रोजी दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद नोंदवली होती. यानंतर तात्काळ सीपीआय बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली बसवेश्वर चौक पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक रमेश पोवार यांनी दुचाकी शोधासाठी पथक कार्यरत केले होते.
त्यानुसार शुक्रवार 7 रोजी सकाळी 10 वाजता निपाणीतील बसस्थानक परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या जायीद व अक्षय यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडील दुचाकीची पाहणी केली असता सदर दुचाकी चोरीची असल्याचे आढळून आले. यावेळी सदर दोघांनाही पोलीस स्थानकात घेऊन येत सखोल चौकशी केली असता त्यांनी गेल्या आठ महिन्यात विविध ठिकाणाहून आपण दुचाकींची चोरी केल्याचे कबूल केले. तसेच 10 पैकी 9 दुचाकी या विक्रीच्या उद्देशाने चिकोडी रोडवरील जनावर बाजारानजीक निर्जनस्थळी लपवून ठेवल्याची कबुलीही दिली. त्यानुसार निपाणी परिसर तसेच कोल्हापूर शहर, हुपरी, गडहिंग्लज, कागल येथून चोरलेल्या 5 लाख 53 हजार रुपये किमतीच्या दहा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.
पोलिसांनी जायीद आणि अक्षय यांच्यावर कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाईबद्दल जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार यांनी बसवेश्वर चौक पोलिसांचे अभिनंदन केले. सदर कारवाईत उपनिरीक्षक रमेश पवार, एएसआय आर. जी. कुंभार, हवालदार एम. ए. तेरदाळ, आर. बी. पाटील, एम. आर. कांबळे, रोहन मदने, प्रशांत कुदरे, जे. पी. संगोडी, विनोद टक्कनावर यांनी सहभाग घेतला.