For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रस्त्या शेजारील फिरते होर्डिंग्स हटवा!

12:46 PM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
रस्त्या शेजारील फिरते होर्डिंग्स हटवा
Advertisement

उच्च न्यायालयाचा आदेश : हे प्रकार धोकादायक असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,वाहतूक खात्यातर्फे कायदेशीर कारवाई करावी

Advertisement

पणजी : गोव्यातील अनेक राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी  हंगामी फिरत्या वाहनांवर तसेच एखाद्या  गाड्यावर रातोरात जाहिरात फलक उभारले जात आहेत.हे प्रकार बेकायदेशीर आणि वाहन चालकांना धोकादायक असल्याने त्याविषयी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक खात्याला कायदेशीर कारवाई करण्याचा थेट आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्या वाल्मिकी मिनेझिस आणि न्या एम. एस. कर्णिक यांनी दिला.राज्यातील रस्त्यांवर आणि राष्ट्रीय महामार्गावर  फिरत्या वाहनांवर तसेच विजेच्या खांबांवर जाहिरात फलक लावले जात असल्याने वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याचा धोका संभवत असतो.

उच्च न्यायालयाने या विषयावर स्वेछेने दखल घेऊन ‘सू मोटो’ याचिका दाखल केली होती.शुक्रवारी सुनावणी दरम्यान, अॅमियस क्युरी आणि एजी देविदास पांगम यांनी गिरी-म्हापसा, मॉल दि गोवा, पर्वरी आणि अन्य ठिकाणी कोणाचीही परवानगी न घेता हंगामी फिरत्या वाहनांवर तसेच एकाद्या  गाड्यावर रातोरात जाहिरात फलक उभारले जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. यासंबंधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक खात्याच्या अधीक्षकांना कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिला. पुढच्या सुनावणीआधी या कारवाईचा अहवाल न्यायालयात सादर करण्यास सांगण्यात आले.

Advertisement

पणजी महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या वतीने वकील सोमनाथ कर्पे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. पणजीत बहुमजली इमारतींवर 64 बेकायदा होर्डिंग्स असून त्यातील 41 हटवले आहेत. त्यातील दोघां जणांनी नगरविकास खात्याच्या सचिवांकडे होर्डिंग्स काढण्याबाबतीत अपिल प्रलंबित फेब्रुवारीपासून असून पाच जणांनी न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे नमूद केले. आता पणजीत बहुमजली इमारतींवर 16 बेकायदा होर्डिंग्स तोडण्याचे काम बाकी असून त्यातील एक स्वत: मालकाने काढले आहे. तर मनपाने 5 होर्डिंग्स काढून टाकले असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने बाजू मांडताना, वकील अॅड प्रवीण फळदेसाई यांनी पुढच्या सुनावणीआधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मान्य केले. पुढील सुनावणी 28 जून रोजी ठेवली आहे.

पणजीत बहुमजली इमारतींवर 10 बेकायदा होर्डिंग्स बाकी

पणजीत बहुमजली इमारतींवर 10 बेकायदा होर्डिंग्स काढण्याचे काम अजूनही बाकी आहे. पणजी मनपाने 19 जून रोजी संबंधित मालकांना 48 तासांची मुदत दिली असून अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. हे 10 होर्डिंग्स मालकांनी न काढल्यास येत्या आठ आठवड्यात त्यांना हटविण्याचे आश्वासन दिले. न्यायालयाने सदर प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेताना मनपाने या कामाचा खर्च संबंधित मालकांकडून वसूल करण्यास सांगितले.

राजदीप, विन्सन ग्राफिक्स यांना नोटीस

राज्यभर असलेल्या अनेक इमारतींवर ’राजदीप बिल्डर्स’चे भलेमोठे बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. हे फलक रात्रीच्यावेळी सुद्धा सुमारे 10 किमी. अंतरावरून दिसून येतात. तसेच, गोव्यातील अनेक राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील विजेच्या खांबांवर जाहिरात फलक उभारण्यासंबधी वीज खात्याने ‘मेसर्स विन्सन ग्राफिक्स’ यांना दिलेल्या कामाच्या आदेशावर न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. संबंधित सर्व अधिकारीणीकडून परवानगी न घेता विजेच्या खांबांवर जाहिरात फलक उभारण्यासंबधी ‘मेसर्स. विन्सन ग्राफिक्स’ यांना आणि ‘राजदीप बिल्डर्स’ यांना नोटीस पाठवून प्रतिवादी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

Advertisement
Tags :

.