लुटारु औरंग्याची कबर उखडून टाका
सातारा :
औरंग्या कोण होता?, तो देवबिव नव्हता तर तो एक लुटारु होता. तो एक चोर होता. त्याचे उदात्तीकरण कशासाठी हवे येथे. त्याच्या कबरीवर चादर चढवणारे त्याचे वंशज आहेत काय?, कबरीला जेसीबी लावा, टाका उखडून कशाला पाहिजे येथे, अशा शब्दात खासदार उदयनराजे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला खणखणीत उत्तर दिले. दरम्यान, छत्रपती शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह राजघराण्यातील जी जी घराणी आहेत. त्यांच्याबाबत चुकीची वक्तव्य, चुकीचा इतिहास, चुकीचे लिखाण करणाऱ्यांवर कठोरात कारवाई करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी याच अधिवेशानात कायदा करावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
जलमंदिर पॅलेस येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले, या संपूर्ण जगात एकमेव राजा होऊन गेला. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते युगपुरुष, महान योद्धे होते. त्या काळात अनेक योद्धे स्वत:चे साम्राज्य वाढवत होते. त्या काळात लोकांचा सहभाग राज्य कारभारात असावा, सर्वधर्म समभावाचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे आणला. त्यांनी स्वराज्य निर्माण केले, परकीय आक्रमणे परतवून लावले. छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आज आपण मोकळा श्वास घेत आहोत. मी देव पाहिला नाही पण देवासारखी माणस पाहिली आहेत. मात्र, आज काय चालले आहे, कोणीही काहीही बरळतोय. उठ सुठ काहीही वक्तव्य करायचे. ते थांबले पाहिजे. पक्ष कुठले जरी असले तरी सामाजिक राजकिय संघटना असतील तरी ते महाराजांच नाव घेऊन काम करत असतात. लोकशाहीत वैयक्तिक पब्लिसिटी मिळवण्यासाठी चुकीचे वक्तव्य करतात. छत्रपती शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह राजघराण्यातील व्यक्तींबाबत कोणीही चुकीचे लिहिले, चुकीचे वक्तव्य केले तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. इनफ आता चौकशीबिकशी नाही. त्याकरता स्पेशल कायदा करावा. परत कोणी बोलण्याचे धाडस केले नाही पाहिजे. जो बोलेल त्याला नॉन बेलेबल लगेच अटक झाली पाहिजे. 10 वर्षाचा कारावास झाला पाहिजे. डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास करुन फास्टट्रॅकमार्फत केस चालवून लगेच शिक्षा सुनावली पाहिजे. कोणत्याही लोकप्रतिनिधीने वक्तव्य केले की त्याला बडतर्फ केलं पाहिजे. याकरता याच अधिवेशनात हा कायदा करावा, तुम्ही बोलतात की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, त्यांचे आदर्श घेऊन काम करतो. तर याच अधिवेशनात स्पेशल कायदा पास करावा. नुसते शासन म्हणजे सत्ताधारी नाही तर विरोधक सुद्धा. सत्ताधारी आणि विरोधकांनी कायदा करावा. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा. एखाद्याला ऐतिहासिक विषयावर पिक्चर काढायचा असेल तर त्या पिक्चरची स्क्रीप्ट अगोदर इतिहासकारांच्या कमिटीला दाखवावी. त्यांनी मंजूरी दिली तर चित्रपट रिलिज करता येईल. कुठली तरी कादंबरी काल्पनिक असेल, आणि त्या कांदबरीवर चित्रपट काढून ज्या घराण्यांनी स्वराज्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेले असेल त्यांच्यावर चुकीचे दाखवले गेले तर त्याचा दूरगामी परिणाम होतो. काल्पनिक कथानक हे तेढ निर्माण करणारे ठरते. कालच शिर्के कुटुंबीय भेटून गेले. छावा चित्रपटामुळे त्यांच्या कुटुंबियाकडे बघण्याचा दृष्टीकोन समाजाचा चुकीचा झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांना शिर्के कुटुंबियांनी पकडून दिले असा कुठेही संदर्भ नाही. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपट काढतानाही त्याची तपासणी इतिहास कमिटीने केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
- औरंगजेब लुटारु होता
औरंगजेब कोण होता तो काय देवबिव नव्हता, तो एक लुटारु होता, तो एक चोर होता. त्याच्या कबरीवर चादर चढवायला जे जातात ते त्याचे वंशज असावेत. त्याची कबर जेसीबीने उखडून टाकली पाहिजे. कशाला हवे आहे उदात्तीकरण, अशीही संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. जे छत्रपतींबद्दल चुकीचे वक्तव्य करतात ते विकृत विचारधारेचे आहेत, अशीही टीका त्यांनी केली.