उज्ज्वलनगर येथील बेकायदेशीर टॉवर हटवा
रहिवाशांची मनपाकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : उज्ज्वलनगर येथे कोणतीही परवानगी नसताना मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा संबंधित मोबाईल टॉवर महानगरपालिकेने हटवावा, अशी मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. उज्ज्वलनगर येथील चौदाव्या क्रॉसजवळ मोबाईल टॉवर उभारल्याने येथील पर्यावरण दूषित बनत चालले आहे. यापूर्वी होणारा पक्ष्यांचा किलबिलाट आता बंद झाला आहे. पर्यावरणही धोक्यात आले आहे. या मोबाईल टॉवरमुळे अनेक दुष्परिणाम होत असून तातडीने तो हटवावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
कारवाई करण्याचे आश्वासन
अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी निवेदन स्वीकारले. याचबरोबर योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी मोहम्मद शोएब, नुमान मुल्ला, जावेद पटेल, सहेरा खानापुरी, रमजानशहा, गौस बी. नदाफ यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.