‘त्या’ जमिनीवरील बेकायदा बांधकाम हटवा
आंबेडकर ब्रिगेडची मागणी : खानापूर तहसीलदारांना निवेदन, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
खानापूर : खानापूर शाहूनगर येथील सर्व्हे नंबर 93/1 या जमिनीवर गेल्या काही वर्षांपासून सिरॅमिक कामगार व शाहूनगर वसाहतीतील नागरिकांचा वाद सुरू आहे. ही जमीन गायरान असून सरकारी असल्याने या जागेवर सिरॅमिक कामगारांनी विनापरवाना घरे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या विरोधात नगरसेवक लक्ष्मण मादार यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर ब्रिगेड या संघटनेने मंगळवारी मोर्चा काढून या जागेवर सुरू असलेली विनापरवाना बेकायदेशीर बांधकामे तातडीने पाडविण्यात यावीत आणि सरकारने ही जमीन ताब्यात घ्यावी, अशा मागणीचे निवेदन शाहूनगर वसाहत आणि आंबेडकर ब्रिगेडच्यावतीने तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांना देण्यात आले. तहसीलदार कोमार यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण सदर निवेदन कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठवू, असे आश्वासन दिले.
याबाबत माहिती अशी, येथील स्टेशनरोडवरील असलेल्या गायरान कमिटीची सर्व्हेनंबर 93/1 ही जागा सिरॅमिक कारखान्यासाठी 99 वर्षे भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. या ठिकाणी सिरॅमिक कारखाना चालविण्यात आला होता. यातील 138 कर्मचाऱ्यांना भूखंडाचे वाटप केले होते. या कर्मचाऱ्यांनी नगरपंचायतीकडून बांधकाम परवानगी न घेता इमारतीचे बांधकाम केले आहे. तसेच या जमिनीबाबत न्यायालयात दावा चालू असताना विनापरवाना इमारती उभारण्यात आल्याने नगरपंचायतीच्या दि. 26 मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र. 82 द्वारे नेंदणी करण्यात आलेले उतारे रद्द करून उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर इमारती पाडविण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावाची अंमलबजावणी करावी आणि या इमारती पाडवाव्यात, तसेच न्यायालयाचा निकाल येईपर्यंत या जागेवर कोणाचाही हक्क संबंध नोंद करू नये. या जमिनीतील काही भूखंड सरकारी सेवेत कार्यरत असलेल्यांनी खरेदी केले आहेत.
सरकारी जमीन असताना सरकारी सेवेत सेवा बजावणाऱ्यांनी जमिनी खरेदी करणाऱ्यांची सखोल चौकशी करून ही खरेदी रद्द करावी आणि कारवाई करावी तसेच न्यायालयात तहसीलदार कार्यालयाच्यावतीने बाजू मांडून न्यायालयातील निकालासाठी सहकार्य करावे, तसेच या जागेवरील वाद कायदेशीर मार्गाने तातडीने मिटवावा. याबाबत शासनाकडून पाठपुरावा न झाल्यास आणि बेकायदेशीर इमारतीवर कारवाई न झाल्यास येत्या काही दिवसात तीव्र्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांना देण्यात आला आहे. यावेळी नगरसेवक लक्ष्मण मादार, रामा कुदळे, राजू सोनटक्के, दीपक सोनटक्के, दिलीप सोनटक्के, सुनील सोनटक्के, हणमंत सोनटक्के यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शाहूनगर वसाहतीतील सर्व नागरिक सहभागी झाले होते.