पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक झाडे हटवा
आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना : 20 ते 30 धोकादायक झाडे असल्याची बैठकीत माहिती
बेळगाव : शहर व उपनगरात विविध ठिकाणी 20 ते 30 झाडे धोकादायक असून ती तातडीने हटविण्याबाबत कार्यवाही करावी, तसेच धर्मवीर संभाजी चौकापासून ते चन्नम्मा सर्कलपर्यंत दुभाजकावर असलेली पाच झाडे धोकादायक आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने शहरात सर्व्हे करून धोकादायक झाडांची माहिती संकलित करावी, अशी सूचना मंगळवारी आरोग्य स्थायी समिती बैठकीत अधिकाऱ्यांना करण्यात आली.
सत्ताधारी गटनेते गिरीश धोंगडी म्हणाले, शहापूर स्मशानभूमीत पुरविण्यात येणारी लाकडे कोठून येतात, त्याचबरोबर स्मशानभूमीच्या देखभालीची जबाबदारी कोणाकडे आहे, डिझेलसाठी किती पैसे घेतले जातात, त्या ठिकाणच्या वॉचमनची वागणूक व्यवस्थित नाही. त्यामुळे यावर कोणाचे नियंत्रण आहे, नागरिकांना सर्व माहिती समजण्यासाठी स्मशानभूमीत रेटचार्ट लावण्यात यावा, अशी सूचना केली. त्यावर यापूर्वी मनपाकडून स्मशानभूमीला गोवऱ्या पुरविल्या जात होत्या. त्या आता बंद झाल्या आहेत. संबंधित वॉचमनला नोटीस देऊन वर्तणुकीत सुधारणा करावी, अशी ताकीद देण्यात येईल, असे सांगण्यात आले.
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून शहरातून जाणे कठीण झाले आहे. त्यामुळे पर्यावरण निरीक्षकांनी रात्री 10 ते 1 पर्यंत मोटारसायकलवरून माझ्यासोबत फिरावे, त्यानंतरच कुत्री हल्ला करतात की नाही हे समजेल, असे गिरीश धोंगडी म्हणाले. महापालिकेकडे 14 फॉगिंग मशीन आहेत. पण फॉगिंग केले जात नाही. नादुरुस्त मशीन तातडीने दुरुस्त करून घ्याव्यात, त्याचबरोबर मोठ्या मशीन खरेदीचे काय झाले? अशी विचारणा अध्यक्ष श्रीशैल कांबळे यांनी केली. मोकाट कुत्री आणि जनावरांची समस्या वाढली आहे. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी मनुष्यबळ कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत निविदा काढून ठेकेदारांची नियुक्ती करावी, अशी सूचना करण्यात आली. पकडण्यात आलेल्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जात आहे, असे सांगितले जात असले तरी या शस्त्रक्रियेवर संशय निर्माण झाला आहे. कारण काही ठिकाणी कुत्री पुन्हा पिलांना जन्म देतात. त्यामुळे याकडे कोणाचे लक्ष आहे की नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
प्रभाग क्र. 24 ची जबाबदारी पर्यावरण निरीक्षकांनी परस्पररित्या विभागून घेतली आहे. मात्र याची कल्पना मनपाला देण्यात आली नाही. त्यामुळे मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या कारभाराबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. किती पर्यावरण निरीक्षकांना आपल्या प्रभागांची माहिती आहे हे सांगावे. त्यामुळे यापुढे प्रभागांची चकबंदी व त्याची माहिती असणे गरजेचे आहे. शास्त्रीनगर, कपिलेश्वर कॉलनी, मुचंडीमाळ या ठिकाणी पावसाळ्यात दरवर्षी पाणी तुंबते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी गटारी व नाल्यांची सफाई करण्यात यावी.
शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे उद्यानात माणसांपेक्षा जनावरांचा वावर वाढला आहे. जनावरांकडून उद्यानात फिरावयास आलेल्या नागरिकांवर हल्ला झाल्यास याला जबाबदार कोण? एखादी दुर्घटना घडल्यास देखभालीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल, शहरात कचऱ्याची व्यवस्थितरित्या उचल करावी, घरातून कचऱ्याची उचल करण्याबरोबरच रस्त्यावर पडलेला कचराही उचलला पाहिजे. घंटागाडी येत असल्याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे कटाक्षाने घंटागाडीवरील स्पीकर कायम सुरू ठेवावेत. पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले व गटारींची सफाई करावी, यावर नियंत्रण व कार्यवाहीसाठी 25 जणांचे पथक तयार करावे, अशी सूचना बैठकीत करण्यात आली.