बेळगुंदी रस्त्यावरील धोकादायक झाडे हटवा
स्थानिक नागरिकांची मागणी : वनखात्याच्या अधिकाऱ्यांना पाहणी करण्याचे आवाहन
वार्ताहर /किणये
बेळगुंदी स्मशानभूमीजवळ झाड कोसळून तीन दिवसांपूर्वी कर्ले गावातील दोन तऊण ठार झाले होते. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. यामुळे कर्ले गावावर शोककळा पसरली. कुटुंबीयही आपल्या घरातील युवक अशा प्रकारे मृत्युमुखी पडल्यामुळे हतबल झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, ज्या कोसळण्याच्या अवस्थेत असणाऱ्या झाडामुळे या तऊणांचा बळी गेला यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. बेळगुंदी, शिवाजीनगर येथील स्मशानभूमीजवळ अनेक झाडे कोसळण्याच्या मार्गावर आहेत. या रस्त्यावरून ये-जा करताना अनेकांच्या छातीत धडकी भरू लागली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन वन खात्याने धोकादायक झाडे व फांद्या तोडणे अत्यंत गरजेचे आहे.
धोकादायक झाडांची तोड व्हावी
यापूर्वीसुद्धा बेळगुंदी स्मशानभूमीजवळ अनेक झाडे कोसळली आहेत. यामुळे कावळेवाडी व बिजगर्णी गावातील बरेच नागरिक जखमीही झालेले आहेत. अशा घटनांचे आमच्याकडे पुरावेसुद्धा आहेत. वास्तविक ही झाडे कोसळून पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी झाडांची पाहणी करणे गरजेचे आहे. जी झाडे कोसळण्याच्या स्थितीत आहेत व ज्या फांद्या पडण्याच्या अवस्थेत आहेत त्यांची तोड करायला हवी. याचबरोबर बेळगुंदी-बिजगर्णी, बेळगुंदी-राकसकोप या रस्त्यांच्या आजूबाजूला झाडेझुडुपे वाढलेली आहेत. याची सार्वजनिक बांधकाम खात्याने साफसफाई करण्याची गरज आहे.
- अॅड. नामदेव मोरे, कावळेवाडी