आनंदनगर वडगाव परिसरातील धोकादायक वृक्ष हटवा
नागरिकांची महापौरांकडे मागणी
बेळगाव : आनंदनगर, वडगाव परिसरात अनेक ठिकाणी धोकादायक वृक्ष आहेत. वृक्ष कोसळून मोठी हानी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वृक्षांच्या मुळांमुळे परिसरातील ड्रेनेज वाहिनी व गॅस पाईपलाईनलाही धोका निर्माण झाला असल्याने तात्काळ धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी आनंदनगर परिसरातील नागरिकांनी महापौर सविता कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. आनंदनगर पहिला, दुसरा व तिसरा क्रॉस येथे धोकादायक वृक्ष आहेत. वरचेवर या वृक्षांच्या फांद्या कोसळून नुकसान होत असते. वृक्ष रस्त्यामध्ये येत असल्याने वाहतुकीचा प्रश्नही निर्माण होत आहे. तसेच वृक्षांची मुळे ड्रेनेज व गॅस वाहिन्यांमध्ये शिरून वारंवार वाहिन्या नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे परिसरातील धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी करण्यात आली. महापौर सविता कांबळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येईल असे सांगितले. यावेळी संतोष पवार, महेश करटे यासह इतर उपस्थित होते.