समर्थनगर येथील लोंबकळणाऱ्या धोकादायक विद्युत वाहिन्या हटवा
बेळगाव : समर्थनगर तिसरा क्रॉस येथील विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत. विद्युत वाहिन्या आता हाताला लागण्या इतपत खाली आल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. एखाद्या निष्पापाचा जीव जाण्यापूर्वी हेस्कॉम प्रशासनाने धोकादायक विद्युत खांब व विद्युत वाहिन्या हटवाव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे. शहरातंर्गंत येणाऱ्या समर्थनगर येथे आधीच अनेक समस्या आहेत. त्यातच आता मागील काही दिवसात झालेल्या सोसाट्याचा वारा, पावसामुळे विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत. दोन विद्युत खांबामधील अंतर अधिक असल्यामुळे विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत. या वाहिन्यातून उच्च प्रतिचा विद्युतभार प्रवाहीत होत असल्याने धोका निर्माण झाला आहे. ये-जा करताना विद्युत वाहिन्या हाताला लागत असल्याने कोणताही धोका निर्माण होण्यापूर्वी विद्युत वाहिन्याची उंची वाढविण्यासोबतच धोकादायक खांब हटविण्याची मागणी होत आहे. हेस्कॉमकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नाराजीचा सूर उमठू लागला आहे.