For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भिंती-लोखंडी साहित्य हटविण्याचे कामकाज युद्धपातळीवर

10:59 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
भिंती लोखंडी साहित्य हटविण्याचे कामकाज युद्धपातळीवर
Advertisement

नावगे क्रॉसजवळील स्नेहम कारखाना आगीत जळून खाक : गुरुवारी सकाळीही कारखान्यातून धूर

Advertisement

वार्ताहर/किणये

नावगे क्रॉस येथील स्नेहम टेपिंग सोल्युशन्स प्रा. लिमिटेड या कारखान्याला मंगळवारी रात्री साडेआठच्या दरम्यान शार्टसर्किटने आग लागली. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. या अग्नितांडवामध्ये मार्कंडेयनगर येथील एका तरुण कामगाराचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी तब्बल 15 तासांच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात आली. गुरुवारी सकाळी या जळलेल्या कारखान्यातील भिंती व लोखंडी साहित्य जेसीबीच्या साहाय्याने हटविण्याचे कामकाज युद्धपातळीवर सुरू होते. गुरुवारी सकाळी अग्निशमन दलाचे शशीधर निलगार यांनी कारखान्याला पुन्हा भेट देऊन पाहणी केली व आपल्या सहकाऱ्यांना काही सूचना केल्या. या ठिकाणी हुबळी येथील चिफफायर ऑफिसर रविप्रसाद व इन्चार्ज रिजनल फायर चंद्रशेखर भंडारी हे ठाण मांडून होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य हटविण्याचे कामकाज सुरू होते.

Advertisement

बेळगाव-चोर्ला रोडवर नावगे क्रॉसजवळील स्नेहम टेपिंग सोल्युशन्स प्रा. लिमिटेड या कारखान्याला मंगळवारी रात्री 8.30 वा. लिफ्टमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या लिफ्टमधून दुर्दैवी यल्लाप्पा गुंड्यागोळ हा केमिकलचे तीन डबे घेऊन जात होता. अचानक शॉर्टसर्किट झाले आणि लिफ्ट बंद पडली. अवघ्या पाच मिनिटांत आगीने भडका घेतला आणि पूर्ण कारखाना जळून खाक झाला. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या तीन कामगारांनी खिडकीतून उडी टाकून आपला जीव वाचविला. यात तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.

लिफ्टमध्ये अडकलेल्या यल्लाप्पाचा आगीत होरपळून मृत्यू झाला. बुधवारी 12 च्या दरम्यान आग विझल्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र आगीत पूर्ण जळाल्यामुळे केवळ सांगाडा राहिला होता. यामुळे त्याच्या केवळ अस्थिच मिळाल्या. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मंगळवारी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल 15 तासांनंतर बुधवारी सकाळी 11.30 वा. ही आग विझविण्यात आली. स्नेहम कारखाना हा चिकटपट्टी तयार करण्याचा आहे. यामध्ये कापड, फॅब्रिक, तसेच ज्वलनशील पदार्थ अधिक प्रमाणात वापरण्यात येतात. त्यामुळेच आग आटोक्यात आणता आली नाही. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी रात्री जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

अग्निशमन दलाचे अधिकारी-कर्मचारी ठाण मांडून

आग विझली तरीही गुरुवारी सकाळी कारखान्यातून धूर येत होता. यामुळे अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी या ठिकाणीच ठाण मांडून होते. तसेच कारखान्यात असलेले लोखंडी साहित्य व भिंती जेसीबीच्या साहाय्याने हटविण्याचे कामकाज सुरू होते. कारखान्याच्या आवारात व प्रवेशद्वारावर गुरुवारीही पोलीस तैनात ठेवण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.