Solapur Politics : बार्शीच्या पाणीटंचाईवर उपाय केले; पण ‘पैसा आणणार कुठून?’ : पालकमंत्र्यांचा सवाल
बार्शी सभेत पालकमंत्री गोरे यांची टोलेबाजी
बार्शी : बार्शीच्या पाणी टंचाईचा प्रश्न तर आम्ही जवळजवळ सोडविला आहेच. त्याशिवाय तीर्थक्षेत्र विकास बार्शी उपसा जलसिंचन सारख्या अनेक योजनांची परिपूर्ती करण्यासाठी मी स्वतः शासनाकडे सातत्याने वकिली करीत राहीन. पण देशात नरेंद्र भाऊचे, राज्यात देवाभाऊंचे, बार्शीत राजाभाऊंचे शासन असेल तर सांगा सोपल साहेब आपण पैसा आणणार कोठून?, असा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सवाल उपस्थित केला.
बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचारानिमित्त रस्त्यावर रविवारी आयोजित सभेत पालकमंत्री गोरे बोलत होते.यावेळी महायुतीचे नेते माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी आपण केलेल्या विकास कामांचा विस्ताराने लेखाजोखा मांडला. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे, सेना नेते भाऊसाहेब आंधळकर, तेजस्विनी कथले यांनी बार्शीकरांसाठी कोणकोणत्या योजना राबवणार याची कल्पना दिली. यावेळी किशोर मांजरे यांनी सभेस संबोधित केले. यावेळी महावीर कदम, राजश्री डमरे, सुवर्णा शिवपुरे, नाना वाणी, संतोष सावळे, सुनील अवघडे यांच्यासह आदी उपस्थित होते. संदीप मिरगणे यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.