तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील उर्वरित डांबरीकरणाचे काम हाती
बेळगाव : तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे उर्वरित काम रविवारी सुरू केले. त्यामुळे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. उड्डाणपूल बंद झाल्याने काँग्रेस रोडवर पुन्हा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. साप्ताहिक सुटी असल्यामुळे गर्दी काहीशी कमी असली तरी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे नाकीनऊ झाले.उड्डाणपुलावरील रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे 7 नोव्हेंबरपासून रस्ता बंद करून कामाला सुरुवात झाली. मुरुम तसेच खडी हटवून त्यानंतर डांबरीकरण केले. 13 दिवस काम सुरू होते. त्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
डांबरीकरणाचा एक पदर दुरुस्तीवेळी घालण्यात आला होता. अवजड वाहनांनी रस्ता कुठे दबला जाईल, हे पाहून डांबरीकरणाची दुसरी पदर घातली जाणार होती. रविवारी सकाळपासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करत डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे सर्व वाहतूक दुसरे रेल्वेगेट मार्गे काँग्रेस रोड येथे वळविण्यात आली. गर्दी होऊ नये यासाठी दुसरे रेल्वेगेट येथे बॅरिकेड्स घालण्यात आले होते. त्यामुळे काँग्रेस रोडवर पहिले रेल्वेगेटपासून बेम्को कॉर्नरपर्यंत वाहनांची गर्दी झाल्याचे दिसून आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे रविवारी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.