‘तेजस’वर मदार, नौदलाच्या शक्तीवर भर !
‘ऑपरेशन सिंदूर’नं हवाई दलाचं महत्त्व पुरेपूर सिद्ध केलंय...भारतानं आत्मनिर्भरतेचा मंत्र जपत आता त्यात देशी बनावटीच्या ‘तेजस’ लढाऊ विमानांचा मोठ्या प्रमाणात भरणा करण्याचा संकल्प सोडलाय. त्यादृष्टीनं नुकताच करण्यात आलाय तो दुसरा करार. मात्र अजूनपर्यंत एकही ‘तेजस’ हवाई दलात भरती होऊ शकलेलं नसून त्याच्या निर्मितीची संथ गती हा काहीसा चिंतेचा विषय राहिलाय...दुसरीकडे, चीनची वाढती शक्ती, हिंदी महासागरातील त्यांच्या अतीव महत्त्वाकांक्षा तसंच पाकिस्तानला त्यांच्याकडून करण्यात येणारी मदत पाहता भारताला नौदल अतिशय मजबूत करण्याची गरजही प्रकर्षानं भेडसावू लागलीय. म्हणूनच आपल्या ताफ्यातील युद्धनौका नि पाणबुड्यांची संख्या झपाट्यानं वाढविण्याच्या दिशेनं मोदी सरकारची पावलं पडू लागलीत...
भारताच्या संरक्षण मंत्रालयानं हिंदुस्तान एअरोनॉटिक्सशी शुक्रवारी करार केलाय तो 97 ‘तेजस मार्क-1ए फायटर्स’साठी...त्यासाठी ओतावे लागतील 66 हजार 500 कोटी रुपये...भारतीय हवाई दलानं त्यापूर्वी फेब्रुवारी, 2021 मध्ये ऑर्डर दिली होती ती 83 ‘मार्क-1ए’करिता. हा व्यवहार 46 हजार 898 कोटी रुपयांचा...विशेष म्हणजे त्यापैकी अजून एकही विमान हवाई दलाला मिळालेलं नाहीये...‘तेजस’ हे चौथ्या पिढीतील लढाऊ विमान असून काही दिवसांपूर्वी 36 ‘मिग-21’ फायटर्स निवृत्त झाल्यानं ‘आयएएफ’च्या ‘फायटर स्क्वॉड्रन्स’ची संख्या पोहोचलीय ती 29 वर. अजूनपर्यंतचा हा सर्वांत कमी आकडा...
एका ‘स्क्वॉड्रन’मध्ये समावेश असतो तो 16 ते 18 जेट्सचा. धोकादायक बाब म्हणजे पाकिस्तानच्या ‘फायटर स्क्वॉड्रन्स’ची संख्या पोहोचलीय ती 25 वर आणि त्यांना चीनकडून लवकरच मिळणार पाचव्या पिढीतील 40 ‘जे-35ए’ स्टिल्थ लढाऊ विमानं...भारताची चीनशी तुलना करणंच अशक्य. कारण ‘ड्रॅगन’च्या भात्यात आहेत भारताहून चार पटींनी अधिक फायटर्स, बॉम्बर्स अन् अन्य प्रकारची विमानं...‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी दर्शन घडलं होतं ते पाकिस्ताननं वापरलेल्या चीननिर्मित ‘जे-10’ फायटर्सचं नि ‘पीएल-15’ या 200 किलोमीटर्सपर्यंत आकाशातून आकाशात मारा करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांचं...
आपल्या दोन्ही पारंपरिक शत्रूंना नेटानं तोंड देण्यासाठी सध्या अधिकृतरीत्या गरज आहे ती किमान 42.5 ‘फायटर स्क्वॉड्रन्स’ची. विशेष म्हणजे ती संख्या देखील अपुरी ठरणार अशी चिन्हं दिसताहेत...भारतीय हवाई दलानं पुन्हा पुन्हा ‘तेजस’ फायटर्सची निर्मिती अतिशय संथ गतीनं होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केलीय. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांच्या मते, देशाला दरवर्षी किमान 40 ‘फायटर्स’चा हवाई दलात समावेश करावा लागेल. 2021 साली करार करण्यात आलेल्या 83 ‘तेजस मार्क-1ए’ जेट्सना फेब्रुवारी, 2024 ते फेब्रुवारी, 2028 या कालावधीत हवाई दलाकडे सुपूर्द करावं लागणार...
तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’नं आणखी 97 ‘मार्क-1ए’ची निवड केलीय. ‘आयएएफ’ला 83 जेट्सपैकी पहिलं विमान हातात पडण्यापूर्वी नवा करार करण्यात अजिबात रस नव्हता. परंतु संरक्षण मंत्रालयाला अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली रक्कम खर्च करायची असल्यानं तो करण्यात आलाय...‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड’नं वचन दिलंय ते 83 पैकी पहिली दोन विमानं ऑक्टोबर महिन्यात स्वाधीन करण्याची. ‘एचएएल’नं ऑगस्ट, 2021 मध्ये 5 हजार 375 कोटी रुपयांच्या साहाय्यानं अमेरिकेच्या ‘जनरल इलेक्ट्रिक’नं तयार केलेली 99 ‘जीई-एफ 404 टर्बो फॅन’ इंजिनं विकत घेण्यासाठी करार केला होता...
अजूनपर्यंत ‘जनरल इलेक्ट्रिक’नं तीन इंजिनं दिलेली असून डिसेंबरपर्यंत त्यात भर पडेल ती आणखी सातची. त्यानंतर प्रत्येक वर्षी भारताला मिळतील 20 इंजिनं...नवीन करार करण्यात आलेल्या 97 ‘मार्क1-ए’साठी 113 इंजिन्सची 1 अब्ज डॉलर्सच्या साहाय्यानं खरेदी करण्यात येईल...
मजबूत नौदलाच्या निर्मितीच्या दिशेनं आगेकूच...
भारत नेटानं पुढं पाऊल टाकतोय ते अतिशय मजबूत नौदलाच्या निर्मितीच्या दिशेनं...2035 पर्यंत त्यात समावेश असेल तो 200 हून अधिक युद्धनौका आणि पाणबुड्यांचा. चीन व पाकिस्तानला तोंड देण्याबरोबरच आपल्या मोठ्या किनारपट्टीचं रक्षण करण्यासाठी भारताला आवश्यकता आहे ती शक्तिमान नौदलाची. सध्याच्या विश्वात डावपेचांच्या दृष्टीनं फार मोठं महत्त्व आलंय ते युद्धनौकांना. या पार्श्वभूमीवर भारत विविध शिपयार्ड्समध्ये बांधणी करतोय 55 लहान-मोठ्या युद्धनौकांची आणि त्यासाठी ओतण्यात आलेत 99 हजार 500 कोटी रुपये. भविष्यात त्यात भर पडेल ती आणखी 74 युद्धनौकांची व त्यासाठी खर्च करावे लागतील 2.3 लाख कोटी रुपये...
नवीन योजनेसाठी अजूनपर्यंत करार करण्यात आलेले नाहीत. त्यात समावेश असेल नऊ डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांचा, सात ‘नेक्स्ट-जनरेशन’ स्टिल्थ फ्रिगेट्सचा, आठ पाणबुडीविरोधी कॉर्व्हेट्सचा आणि 12 माईन काऊंटर मेजर व्हेसल्सचा...खेरीज चार अतिशय आधुनिक विनाशिकांची निर्मिती करण्यात येणार असून त्यातील प्रत्येक नौका असेल ती 10 हजार टन्सची. नौदलाला ‘आयएनएस विक्रांत’प्रमाणंच 40 हजार टन्सपेक्षा जास्त क्षमतेची आणखी एक विमानवाहू नौका हवीय. ती जागा घेणार जुन्या झालेल्या नि रशियानं बांधलेल्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ची. कुठल्याही राष्ट्राला एका रात्रीत सुसज्ज नौदलाची निर्मिती करणं शक्य नाहीये. त्यासाठी गरज असते ती उत्कृष्ट नियोजन व सुयोग्य बांधणीची...
अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन या ‘पी-फाईव्ह’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या राष्ट्रांच्या व्यतिरिक्त विमानवाहू नौकांचं डिझाईन व निर्मिती करण्याची क्षमता असलेला एकमेव देश म्हणजे भारत...बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं बसविलेल्या अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या बांधण्याची ताकद देखील आपण मिळविलीय. सध्या भारताच्या नौदलात समावेश आहे तो 140 युद्धनौकांचा (त्यात 17 डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांचा अंतर्भाव व त्यापैकी 11 अतिशय जुन्या). त्याशिवाय दिमतीला आहेत दोन अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या...भविष्यात अनेक युद्धनौका निवृत्त होणार असल्यानं देशानं युद्धनौका व पाणबुड्यांची संख्या 200 च्या पार नेण्याचा डावपेच रचलाय...नौदलाच्या ताफ्यात आहेत 250 लढाऊ विमानं नि हेलिकॉप्टर्स. त्यांची संख्याही 350 हून अधिक करण्यासाठी हालचाली चालल्याहेत...
कदाचित 2037 पर्यंत भारताच्या नौदलात समावेश असेल तो 230 युद्धनौकांचा...जगातील सर्वांत मोठं नौदल हे चीनचं. त्यांच्या भात्यात आहेत 370 युद्धनौका आणि पाणबुड्या. त्या देशाचं सारं लक्ष हिंदी महासागरावर असल्यामुळं ‘ड्ग्रन’ अतिशय वेगानं प्रगती करतोय. खेरीज आफ्रिकेत दिबुती, पाकिस्तानात कराची व ग्वादर आणि कंबोडियात रीम इथं त्यांनी तळ उभारलेत...राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं राष्ट्र पाकिस्तानचं नौदल देखील बळकट व्हावं म्हणून प्रयत्न करतंय. उदाहरणार्थ लवकरच आपल्या शेजाऱ्याला मिळणार 8 ‘युआन’ वा ‘हँगॉर’ वर्गातील डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या. त्यांची पाण्यात राहण्याची क्षमताही जास्त असेल...
सध्या पाकिस्तानजवळ आहेत ‘अगोस्टा’ वर्गातील 5 अतिशय जुन्या पाणबुड्या. परंतु ‘हँगॉर’ वर्गातील पाणबुड्यांचा समावेश पाक नौदलात झाल्यानंतर अतिशय सावध राहावं लागेल ते भारताला...भारताचीही सहा नवीन डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या बांधण्यासाठी चर्चा चालू असून त्यावर बसविण्यात येतील ती जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेली 70 हजार कोटी रुपयांची ‘क्रूझ’ क्षेपणास्त्रं. त्यांची निर्मिती जर्मन कंपनी व माझगाव गोदी मिळून करतील !
पाणबुड्यांसाठी ‘रिएक्टर’चा विकास...
? भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर सध्या ‘रिएक्टर’चा विकास करत असून भारतीय नौदलाच्या भविष्यातील पाणबुड्यांवर ते बसविण्यात येतील. तिथं काम करणाऱ्या एका शास्त्रज्ञानं दिलेल्या माहितीनुसार, ही योजना अतिशय गुप्तरीतीनं पुढं चाललीय आणि रिएक्टर बसविण्यात येतील ते ‘एस-5’ वर्गातील ‘न्युक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल्स’नी सज्ज पाणबुड्यांवर आणि ‘न्युक्लिअर पॉवर्ड अॅटेक’ पाणबुड्यांवर...
? नवीन ‘रिएक्टर’ची क्षमता असेल ती सुमारे 200 मेगावॅट इतकी...‘आयएनएस अरिहंत’ व ‘आयएनएस अरिघात’वर बसविलेल्या रिएक्टर्सची क्षमता आहे 83 मेगावॅट...सध्या तिसऱ्या ‘आयएनएस अरिधमन’च्या चाचण्या चालल्याहेत...
? नवीन रिएक्टरमुळं भविष्यातील पाणबुड्यांना अधिक शक्ती व जास्त काळ पाण्यात राहण्याची क्षमता प्राप्त होईल...
संरक्षणावर खर्च करणारी विश्वातील प्रमुख राष्ट्रं...
राष्ट्राचं नाव खर्च
अमेरिका 997 अब्ज डॉलर्स
चीन 314 अब्ज डॉलर्स (निश्चित आकडा सांगणं कठीण)
रशिया 149 अब्ज डॉलर्स (निश्चित आकडा सांगणं कठीण)
जर्मनी 88.5 अब्ज डॉलर्स
भारत 86.1 अब्ज डॉलर्स
ब्रिटन 81.8 अब्ज डॉलर्स
सौदी अरेबिया 80.3 अब्ज डॉलर्स (निश्चित आकडा सांगणं कठीण)
फ्रान्स 64.7 अब्ज डॉलर्स
युक्रेन 64.7 अब्ज डॉलर्स
जपान 55.3 अब्ज डॉलर्स
जागतिक चित्र...
? 2024 साली जगभरातील राष्ट्रांनी संरक्षणावर 2.7 ट्रिलियन डॉलर्स खर्च केले...
? 100 राष्ट्रांनी सरंक्षणाच्या अंदाजपत्रकात वाढ केलेली असली, तरी तब्बल 73 टक्के वृद्धी केलीय ती अवघ्या 10 देशांनी...
? संयुक्त राष्ट्रांत आफ्रिका खंडातील देशांची संख्या 25 टक्के असली, तरी त्यांचा संरक्षणावरील खर्च मात्र केवळ दोन टक्के...
संकलन : राजू प्रभू