Satara News : कुसगाव क्रशर मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ; ग्रामस्थांकडून वाई पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन
ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
वाई : कुसगाव येथील ब्लॅक जेम्स स्टोन क्रेशर परिसरामध्ये झालेल्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी वाई पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
कुसगाव येथील ब्लॅक जेम्स स्टोन क्रेशर परिसरामध्ये मुकुटराव घाडगे या ग्रामस्थांचा आकस्मिक मृत्यू झाला. यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाले. सदर मृत्यू ब्लास्टिंगमुळे झाल्याचा आरोप घाडगे यांच्या कुटुंबीयांनी केला व क्रशर मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. मात्र आकस्मिक मृत्यू झाल्यास तपास झाल्यावरच गुन्हा दाखल करण्यात येतो, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, मागील दोन वर्षांच्या कालावधीत क्रशर प्रकरणांमध्ये ग्रामस्थांवर शेकडो गुन्हे दाखल झाले.
त्यावेळी मात्र पोलिसांनी कोणत्याही गोष्टीचा तपास न करता थेट ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले व ग्रामस्थांना आपली बाजू न्यायालयातच मांडायला लागली. आता क्रशरमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असताना तपास झाल्यावरच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस सांगत आहेत. त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.