मुनिरना अधिकार देण्यास टाळाटाळ
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानचे ‘फिल्ड मार्शल’ असीम मुनिर यांना अनिर्बंध अधिकार देण्यासाठी पाकिस्तानच्या संसदेने घटनापरिवर्तन विधेयक संमत केले असले, तरी पाकिस्तानचे नेते शहाबाझ शरीफ यांनी मुनिर यांच्याकडे प्रत्यक्ष असे अधिकार देण्यास टाळाटाळ चालविल्याचे दिसून येत आहे. घटना परिवर्तन विधेयक संमत झाले असले तरी जोपर्यंत त्याची नोंद प्रशासकीय परिपत्रकात होत नाही, तोपर्यंत कोणताही अधिकार मुनिर यांना मिळू शकत नाही. या विधेयकाची नोंद प्रशासकीय परिपत्रकात करण्याचे अधिकार शहाबाझ शरीफ यांच्याकडे आहेत. तसेच यासाठी कोणतीही निश्चित कालावधी नाही. तथापि, नोंद करण्याचा आदेश न देताच शरीफ हे वैद्यकीय उपचारांच्या निमित्ताने लंडनला गेले आहेत. त्यामुळे मुनिर यांचे अधिकारग्रहण रेंगाळले आहे. शरीफ यांनी हे हेतुपुरस्सर केले आहे, अशी चर्चा पाकिस्तानातील राजकीय वर्तुळात आहे. यातून नवा वाद निर्माण होणार आहे.
मुनिर यांना ते जिवंत आहेत तोपर्यंत किंवा त्यांनी स्वत:हून पद सोडेपर्यंत पाकिस्ताचे भूसेना प्रमुखपद आणि तीन्ही सेनांचे प्रमुखपद दिले जाणार आहे. इतकेच नव्हे, तर त्यांना अनेक प्रशासकीय अधिकारही मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदच्युत करणे किंवा त्यांची नियुक्ती करणे, हे अधिकारही त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे ते असेपर्यंत कोणत्याही पाकिस्तानी सरकारला त्यांचे बाहुले म्हणूनच काम करावे लागणार आहे. हे पाकिस्तानातील कोणत्याही राजकीय पक्षाला नको आहे. म्हणून, शरीफ हे लंडनला गेले असून मुनिर यांना पाकिस्तानचा सर्वेसर्वा बनविण्याची टाळाटाळ ते करीत आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये त्यामुळे नवे शीतयुद्ध होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.