नायजेरियातील धार्मिक हिंसाचार : भ्रम आणि वास्तव
गेल्या शनिवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंटागॉनला नायजेरियात संभाव्य लष्करी कारवाईची योजना सुरू करण्याचे आदेश दिले. याप्रसंगी ‘जर नायजेरिन सरकारने ख्रिस्ती लोकांच्या हत्येला परवानगी दिली तर अमेरिका नायजेरियाला मिळणारी सारी मदत ताबडतोब थांबवेल’ असा इशाराही ट्रम्प यांनी दिला. खुलेआम बंदुकांचा वापर करणाऱ्या या बदनाम देशात जाऊन इस्लामिक दहशतवाद्यांचा अमेरिका संपूर्ण विनाश करेल असेही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यांमुळे एरवी गाझा युद्ध, युक्रेन संघर्ष, चीन-अमेरिका व्यापार सामंजस्य करार या चर्चेतील मुद्यांकडून जगाचे लक्ष द. आफ्रिकेतील नायजेरियाकडे वळले आहे.
सुमारे 22 कोटी इतकी लोकसंख्या असलेला नायजेरिया आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. सुमारे 200 वांशिक गट अस्तित्वात असलेल्या नायजेरियात उत्तरेकडे मुस्लिम लोकसंख्या अधिक आहे. तर दक्षिण भाग ख्रिस्तीबहुल लोकसंख्येचा आहे. बोको हराम, इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका आणि अल कायदा या सारख्या इस्लामिक दहशतवादी संघटनांचे नायजेरियात प्राबल्य आहे. या संघटनांनी तेथील दहशतवादास पोषक परिस्थितीचा फायदा घेऊन गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळात हजारो लोकांचा बळी घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणाऱ्या ‘विशेष चिंताजनक’ देशात नायजेरियाचा समावेश केला आहे. या यादीतील इतर देशांमध्ये चीन, म्यानमार, उत्तर कोरिया, रशिया आणि पाकिस्तानचा समावेश आहे.
ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीस उत्तर देताना नायजेरियाचे अध्यक्ष बोला टिनूबूंनी, ‘धार्मिक स्वातंत्र्य आणि सहिष्णूता हे आमच्या सामूहिक ओळखीचे मुख्य तत्व आहे, नायजेरिया धार्मिक छळाचा विरोध करतो आणि त्याला प्रोत्साहन देत नाही. जोपर्यंत नायजेरियाच्या प्रादेशिक अखंडत्वाचा आणि सार्वभौमत्वाचा अमेरिका आदर करते तोपर्यंत आम्ही अमेरिकेच्या दहशतवादविरोधी मदतीचे स्वागत करतो’ म्हणत चेंडू ट्रम्प यांच्या कोर्टातच टोलावला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर नायजेरियात नेमकी परिस्थिती काय आहे? ख्रिस्ती धर्मियांवर होणाऱ्या सतत हल्यांचा ट्रम्प यांचा दावा कितपत खरा आहे? तेथील हिंसाचारावर कोणते उपाय परिणामकारक ठरू शकतात याचा आढावा घेणे अगत्याचे ठरते. वास्तविक भारताप्रमाणेच बहुधार्मिक, बहुवांशिक आणि बहुभाषिक असलेला नायजेरिया द. आफ्रिकेतील एक आदर्श लोकशाही देश बनू शकतो. परंतु राजकीय हितसंबंध व स्पर्धा, वसाहतवादी इतिहास, जमिनींचा वाद, वांशिकता पंथ संलग्नता, पशुपालक आणि शेतकरी समुहातील वैर, गरिबी, कायदा व सुव्यवस्थेचा अभाव अशा एकात एक गुंतलेल्या समस्यांमुळे स्थिर आणि लोकशाहीस साजेसा देश बनण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
19 व्या शतकाच्या सुरवातीपासून नायजेरिया ब्रिटिश साम्राज्याची वसाहत म्हणून अस्तित्वात होता. 1960 साली तो स्वतंत्र संघराज्य बनला आणि 1963 साली प्रजासत्ताक घोषित झाला. तथापि, यानंतरच्या काळात गृहयुद्ध, लष्करी हुकूमशाही आणि लोकशाही अशी अस्थिर स्थिती या देशाने अनुभवली. 1999 साली नायजेरियात नवे संविधान निर्माण झाले आणि स्थिरतेकडे जाऊ पाहणारे सरकारही सत्तेवर आले. परंतु दीर्घकालीन वसाहतवादाने समाजात रूजवलेली वांशिक अस्मिता, संस्थात्मक वंशवाद, आर्थिक शोषणातून निर्माण झालेली गरिबी, सामाजिक भेदभाव, वर्चस्ववादी मनोवृत्ती ही अनिष्टे दूर झाली नाहीत. नायजेरियाला स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील नववसाहतवादी किंवा आर्थिक साम्राज्यवादी पाश्चात्य सत्ता आणि संस्थांनी नायजेरियासह इतर आफ्रिकन देशात गुंतवणूक, मदत, कर्जे, व्यापार इत्यादी धोरण संरचनेद्वारे मागील काळातील वातावरण कायम राहील अशी स्थिती निर्माण केली. असेही दिसून आले की, आफ्रिकेला मिळणारी विदेशी मदत भ्रष्टाचार व अकार्यक्षम सरकारांना प्रोत्साहन देत उत्पादन क्षमता, रोजगार आणि व्यापारास हानी पोहचवते. वसाहतीकरणाद्वारे साम्राज्यवादी शक्तींनी आपल्या प्रशासकीय हेतूंसाठी निर्माण केलेले वांशिक आणि राष्ट्रीय सीमांचे स्वरूप, प्रादेशिक विभाजन नायजेरियन सत्ताधिशांना बदलता आले नाही. त्यामुळे प्रदेशवाद, धर्मवाद, वंशवाद, आदिवासीवाद या समस्यांची टांगती तलवार कायम राहिली.
नायजेरियात हौसी, फुलानी, योरूबा आणि इग्बो हे चार प्रमुख वांशिक गट परस्पर भिन्नता जोपासतात. सामायिक व सामुहिक एकता मुल्यांच्या अभावामुळे व्यक्तींना ‘नायजेरियन’ ही राष्ट्रवादी एकात्म ओळख सांगण्याऐवजी आपली वांशिक ओळख सांगण्यात धन्यता वाटते. परिणामी चार प्रमुख वांशिक गट आणि इतर अनेक अल्पसंख्याक गटांमध्ये अस्मिता संघर्ष, स्पर्धा, वैमनस्य अस्तित्वात आहे. नायजेरियन लोकसंख्येतील तीन प्रमुख विभाग ख्रिस्ती, मुस्लीम आणि आदिवासी अशा धार्मिक वर्गीकरणात मोडतात. त्यातही हौसा वंशाचे प्रामुख्याने मुस्लीम धर्मिय तर इग्बो वंशीय ख्रिस्ती अशी पोटविभागणी आहे. आदिवासींना त्यांच्या समुहाप्रमाणे पारंपारिक आचरण पद्धत आहेत. ज्या विशिष्ट धर्माशी संबंधीत नाहीत. तेथील बहुवांशिक व धार्मिक विभाजित समाजातील संघर्ष, नैसर्गिक संपतीवरील वर्चस्वावरून तर कधी तिच्या कमतरतेतून व मागणीवरून उद्भवत राहतात. अशारितीने नायजेरियातील व्यक्तींचे वांशिक व धार्मिक अस्तित्व एकप्रकारे ओळख, विषमता आणि सामुहिक हितास नकाराचे स्त्राsत बनून राहते.
अशा प्रकारचा शतखंडीत समाज दहशतवादासाठी पोषक वातावरण तयार करतो. नायजेरियात असेच घडले आहे. बोको हराम, इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका या दोन इस्लामी दहशतवादी संघटना परस्पर सहकार्याने नायजेरियात कार्यरत आहेत. दोन्ही संघटनांतील साधारणत: 8 हजार दहशतवादी नायजेरियात धुडगूस घालत आहेत. बोको हरामला, सरकार उलथवून टाकून नायजेरियाचे इस्लामीकरण करायचे आहे. देशांतर्गत अशांतता, बेरोजगारी आणि खराब प्रशासनामुळे तरूण वर्ग दहशतवादाकडे आकर्षिला जात आहे. असे असले तरी, नायजेरियातील गुंतागुंतीच्या आर्थिक व सामाजिक स्थितीतून प्रकटणारे वास्तव पाहता डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला ख्रिस्ती नरसंहाराचा दावा प्रचारकी व आपल्या देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्रिस्ती पाठिराख्यांना खुष करण्यासाठीचा कांगावा ठरतो. प्रत्यक्षात नायजेरियातील परस्पर संघर्ष बहुआयामी आहेत. वांशिक शत्रुत्व, जमीन व नैसर्गिक संसाधनांवरील वाद, गुन्हेगारी, राजकीय गटबाजी ही त्यांची ठोस कारणे आहेत. धर्म बहुतेकदा दुय्यम कारण बनतो. 2009 साली नायजेरियातील बोनो राज्यात मैदुगुरी येथे उदयास आलेल्या बोको हरामने इस्लामीकरणाचा मूळ उद्देश कालांतराने बाजूस सारून नायजेरियन सत्तेविरूद्ध स्वत:स ‘धर्मत्यागी’ अस्तित्व म्हणून उभे केले. त्यामुळे ही संघटना स्थानिक हितसंबंधांच्या लढाईत स्व:अस्तित्व अबाधित राखण्यासाठी मुस्लीमांनाही लक्ष्य करते. उत्तर नायजेरियातील हिंसाचार अनेकदा फुलानी मेंढपाळ आणि हौसा शेतकरी समुदाय यांच्यातील संघर्षामुळे होत असतो हे दोन्ही वांशिक गट धर्माने मुस्लीम आहेत. बोको हराम आणि इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटना या संघर्षात संधीसाधू भूमिका बजावतात. धार्मिक हिंसा म्हणून पुढे आणल्या जाणाऱ्या हिंसाचाराचा एक महत्त्वपूर्ण घटनाक्रम नायजेरियाच्या मध्य पट्यातील दीर्घकाळ चाललेल्या मेंढपाळ व शेतकरी संघर्षामुळे उद्भवतो. मेंढपाळ बहुसंख्य मुस्लीम, तर शेतकरी मोठ्या संख्येने ख्रिस्ती आणि इतर गटातील आहेत. ही संख्याशास्त्राrय विभागणी धार्मिक युद्धाचा भ्र्रम निर्माण करते. दोन्ही बाजू गुन्हेगार आणि बळी आहेत. राजकीय नेते आपल्या फायद्यासाठी वंश व धर्माधारित राजकारण करून समाज विभाजन अधिकच संघर्षमय बनवतात. भ्रष्टाचार, शस्त्रास्त्रांची सहज उपलब्धतता, कमी संख्येची कमकुवत सुरक्षा दले, हिंसाचारास पुरक भूमिका बजावतात.
विपूल नैसर्गिक संपत्ती, खनिजांचे साठे, तरूणांची मोठी संख्या उपलब्ध असलेल्या नायजेरियास वंश व धर्मनिरपेक्ष प्रबळ राजकीय नेतृत्वाची गरज आहे. राष्ट्रीय एकात्मता, सहिष्णूता, लोकशाही मूल्ये समाजात खोलवर रूजवणारे, सुरक्षा यंत्रणा प्रभावी बनवणारे, दहशतवादाचा बिमोड करणारे विकासात्मक धोरण अवलंबणारे राजकीय नेतृत्व लाभल्यास नायजेरिया एक प्रभावी जागतिक शक्ती म्हणून निश्चितच पुढे येऊ शकतो.
अनिल आजगांवकर