पोक्सो प्रकरणात येडियुराप्पांना दिलासा
बेंगळूर : पोक्सो प्रकरणी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना अटक करू नये, असा अंतरिम आदेश यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला होता. हा आदेश मागे घेण्याची विनंती करत सीआयडीचे वकील अशोक नायक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती एम. नागप्रसन्न यांच्या एकसदस्यीय पीठाने सुनावणी हाती घेतली. येडियुराप्पांच्या वकिलांनी केलेल्या विनंतीवरून न्यायालयाने सुनावणी 30 पर्यंत लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे येडियुराप्पा यांना पुन्हा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून येडियुराप्पा यांच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी राज्य सरकारने सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते. सीआयडीने न्यायालयात चार्जशीट दाखल केले. या प्रकरणात अटकेची भीती निर्माण झाल्याने येडियुराप्पांनी प्रकरण रद्द करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने येडियुराप्पा यांना अटक करू नये, असा अंतरिम आदेश दिला होता.