एच. डी. रेवण्णा यांना पुन्हा दिलासा
लैंगिक शोषण प्रकरणात सशर्त जामीन मंजूर
प्रतिनिधी/ बेंगळूर
हासन जिल्ह्यातील होळेनरसीपूरचे निजद आमदार आणि माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना आणखी पुन्हा दिलासा मिळाला आहे. घरकाम करणाऱ्या महिलेने रेवण्णांवर अत्याचाराचा आरोप केला होता. या प्रकरणात एच. डी. रेवण्णा यांना बेंगळूरच्या 42 व्या एसीएमएम न्यायालयाने सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणात रेवण्णा यांना अंतरिम जामीन मिळाला होता. शिवाय न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता. सोमवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे. प्रीत यांनी रेवण्णांना जामीन मंजूर केला. 5 लाख रुपयांचे हमीपत्र, दोघांची हमी आणि इतर अटी घालण्यात आल्या आहेत. माजी मंत्री एच. डी. रेवण्णा आणि त्यांचे पुत्र खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर घरकाम करणाऱ्या 47 वर्षीय महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या महिलेने 28 एप्रिल रोजी रेवण्णा पिता-पुत्राविरुद्ध होळेनरसीपूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी एच. डी. रेवण्णा यांनी जामिनासाठी अर्ज केला. मागील आठवड्यात गुरुवारी आणि शुक्रवारी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र, एसआयटीच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला होता. युक्तिवाद-प्रतिवाद झाल्यानंतर न्यायालयाने शुक्रवारी निकाल राखून ठेवला होता.