पूरग्रस्तांना प्रत्येकी 7 हजार रुपयांची मदत
मुख्यमंत्री नितीश कुमार यांची घोषणा
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी घोषणा केली आहे. पूरग्रस्तांना प्रत्येकी 7 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. दरभंगाच्या इनडोअर स्टेडियममध्ये पूरग्रस्तांसाठी तयार करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांची पाहणी करत नितीश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिशानिर्देश जारी केले आहेत. लवकरात लवकरच पूरग्रस्तांपर्यंत मदतसामग्री पोहोचविण्याचा निर्देश नितीश यांनी दिला आहे. विजयादशमीपूर्वी पूरग्रस्तांच्या बँक खात्यात मदतनिधी पोहोचणार असल्याचे नितीश यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री नितीश यांनी किरतपूर येथील पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्याचे समाजकल्याणमंत्री मदत सहनी यांनी पूरग्रस्तांना प्रत्येकी 7 हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याचे सांगितले आहे. ही रक्कम 9 ऑक्टोबरपर्यंत पीडितांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. सुमारे 50 हजार पूरग्रस्तांना हा मदतनिधी मिळणार असल्याचे सहनी यांनी सांगितले आहे.