For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नगरविकास खात्याच्या आदेशानंतरच घरपट्टी भरलेल्यांना सवलतीचा दिलासा

12:21 PM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
नगरविकास खात्याच्या आदेशानंतरच घरपट्टी भरलेल्यांना सवलतीचा दिलासा
Advertisement

दंडाच्या रकमेसह 5 टक्के सवलत मिळण्याची शक्यता : मनपाकडून सरकारकडे पाठपुरावा

Advertisement

बेळगाव : नगरविकास खात्याने बेळगावच्या जनतेला 14 सप्टेंबरपर्यंत घरपट्टी भरण्यासाठी 5 टक्के सवलत दिली आहे. मात्र, मध्यंतरी ज्यांनी 2 टक्के दंडासह घरपट्टी भरली आहे, त्यांना ती रक्कम परत देणार का? असे महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी याबाबत नगरविकास खात्याकडे पाठपुरावा केला आहे. तेथून आदेश आल्यानंतर संबंधितांना रक्कम परत दिली जाईल किंवा पुढील घरपट्टी भरताना त्यामध्ये सूट दिली जाईल. मात्र, तेथून आदेश आल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

महानगरपालिकेचे आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून प्रारंभ होते. एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱ्यांना 5 टक्के सवलत दिली जाते. मात्र, यावेळी लोकसभा निवडणूक व सर्व्हरडाऊन समस्येमुळे केवळ आठ ते दहा दिवस जनतेला कर भरण्यास मुभा मिळाली होती. त्यामुळे अनेकजण या सवलतीपासून वंचित होते. महापालिका, माजी नगरसेवक संघटना व इतर संघटनांनी सवलतीत कर भरण्यासाठी आणखी एक महिना द्यावा, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेऊन जून महिन्यामध्ये 5 टक्के सवलत दिली होती.

Advertisement

त्यानंतर जुलै महिन्यामध्ये विनासवलत रक्कम भरावी लागली होती. ऑगस्टमध्ये तर 2 टक्के दंडासह रक्कम जनतेने भरली. मात्र, त्यानंतर 29 ऑगस्टला सरकारकडून 14 सप्टेंबरपर्यंत घरपट्टी भरणाऱ्यांना 5 टक्के सवलत दिली जाईल, असा आदेश दिला गेला. त्यामुळे आता कर भरण्यासाठी जनता पुढे येत आहे. मात्र, ज्यांनी दंडासह रक्कम भरली आहे, त्यांना ती रक्कम परत मिळणार का? असा प्रश्न पडला आहे. याबाबत महसूल उपायुक्तांशी चर्चा केली असता त्यांनी आम्ही नगरविकास खात्याकडे पत्र पाठवून दिले आहे, त्याचे उत्तर आल्यानंतरच त्याबाबतचा निर्णय जाहीर होणार असल्याचे सांगितले.

मनपाला 73 कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. सध्या 60 टक्क्यांपेक्षा अधिक उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. उर्वरित सात महिन्यांमध्ये 40 टक्के उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे. असे असले तरी काही घरमालक व विविध आस्थापनांच्या मालकांनी अनेक वर्षांची घरपट्टी व कर भरला नाही. परिणामी मनपावर ताण पडत आहे. याबाबत काहीजणांना नोटीस बजावण्यात आली. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष केले आहे. संबंधितांना सूट देण्यासाठीच नगरविकास खात्याने हे पाऊल उचलले आहे. तेव्हा थकीत असलेल्या घरपट्टी मालकांनीही याचा लाभ घेतल्यास निश्चितच फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर्षासाठीच संबंधितांना 5 टक्के सूट दिली जाणार आहे. मागील घरपट्टी मात्र दंडासहीतच भरावी लागणार आहे. सरकारच्या आदेशानुसार आम्ही ही सवलत देत आहोत. तेव्हा बेळगावच्या जनतेने याचा लाभ घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे.

Advertisement
Tags :

.