कणेरी मठाच्या स्वामीजींना दिलासा
बेंगळूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींना पुढील दोन महिने धारवाड जिल्हा प्रवेशावर घालण्यात आलेले निर्बंध उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. धारवाड जिल्हाधिकाऱ्यांनी कणेरी मठाच्या स्वामींजींच्या धारवाड जिल्हा प्रवेशावर निर्बंध घातले होते. हा आदेश रद्द करण्यात आल्याने स्वामीजींना दिलासा मिळाला आहे.धारवाड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध काडसिद्धेश्वर स्वामीजींनी रिट याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणी पूर्ण करून राखून ठेवलेला निकाल उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने मंगळवारी जाहीर केला.
स्वामीजींना दोन महिन्याच्या कालावधीपर्यंत धारवाड जिल्हा प्रवेशावर निर्बंध घालण्यासाठी सरकारने समर्थनीन बाबी नमूद केलेल्या नाहीत. वरकरणी सरकारचा आदेश निर्दयी आणि न्यायाच्या तत्त्वांविरुद्ध आहे, असे मतही न्यायालयाने नोंदविले आहे. कणेरी मठाच्या स्वामीजींना समाजात मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. अध्यात्मिक नेत्यांमध्ये मतभेद निर्माण होणे हे दुर्दैवी आहे. तरी सुद्धा संविधानाच्या कलम 19(1)(ड) अंतर्गत हमी असलेल्या मूलभूत हक्कांची व्याप्ती प्रत्येक नागरिकाला भारतात कोठेही मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार देते, असा उल्लेख न्यायालयाने आदेशात केला आहे.