रिलायन्स जिओचा आयपीओ येणार पुढील वर्षी
100 अब्ज डॉलर्सची होणार उभारणी
वृत्तसंस्था/ मुंबई
तेल, रिटेल यासह दूरसंचार अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या दिग्गज रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्याकडून रिलायन्स जिओचा आयपीओ पुढीलवर्षी सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. या आयपीओनंतर रिलायन्स रिटेलचा आयपीओ सादरीकरण करण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे.
रिलायन्स जिओचा आयपीओ पुढीलवर्षी म्हणजेच 2025 मध्ये बाजारात दाखल केला जाणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून 100 अब्ज डॉलरची उभारणी केली जाणार आहे. रिलायन्स रिटेलचा आयपीओ मात्र 2025 नंतर आणण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे समजते.
आयपीओची तयारी
2019 मध्ये रिलायन्सचे सर्वेसर्वा मुंकेश अंबानी जिओ आणि रिलायन्स रिटेल पुढील पाच वर्षामध्ये सूचीबद्ध होतील, असे म्हटले होते. पण त्यानंतर मात्र याबाबत कोणतीही ताजी माहिती आली नव्हती. गेल्या काही वर्षांमध्ये अंबानी यांनी केकेआर, जनरल अॅटलांटिक आणि अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अॅथॉरेटी यासारख्या दिग्गज गुंतवणूकदारांकडून डिजीटल, दूरसंचार आणि रिटेल व्यवसायासाठी एकूण 25 अब्ज डॉलर्स उभे केले होते.
सर्वात मोठा आयपीओ ?
479 दशलक्ष ग्राहक असणाऱ्या जिओ कंपनीच्या उत्पन्नामध्ये सातत्याने वाढ होत असून दूरसंचार क्षेत्रामध्ये पाहता भारतातील नंबर 1 ची कंपनी म्हणून रिलायन्स जिओचा उल्लेख केला जातो. रिलायन्सच्या मते 2025 मध्ये येणारा रिलायन्स जिओचा आयपीओ हा सर्वात मोठा असू शकतो. जेफ्रीज यांच्या जुलैमधील अंदाजानुसार जिओच्या आयपीओचे मुल्यांकन 112 अब्ज डॉलर्सचे होऊ शकते.