ग्रामीण भागात वाहन विक्री वाढली
ऑक्टोबरमध्ये विक्री 32 टक्क्यांनी मजबूत
नवी दिल्ली :
भारतात वाहनांची किरकोळ विक्री ऑक्टोबरमध्ये वार्षिक 32 टक्क्यांनी वाढून 28,32,944 युनिट्सवर पोहोचली आहे. दुचाकी आणि प्रवासी वाहनांसह सर्व विभागांमध्ये जोरदार वाढ नोंदवली गेली. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन उद्योग संघटनेने (फाडा) बुधवारी ही माहिती दिली. ऑक्टोबर 2023 मध्ये किरकोळ विक्री 21,43,929 युनिट्स होती.
फाडाच्या मते, या वर्षी ऑक्टोबरमध्ये मजबूत वाढीचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील मजबूत मागणी होय. विशेषत: दुचाकी आणि प्रवासी वाहनांच्या विक्रीतील वाढ आणि रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ महत्त्वाची ठरली.
प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ
प्रवासी वाहनांची विक्री ऑक्टोबर 2023 मध्ये 3,64,991 युनिट्सवरून 32.38 टक्क्यांनी वाढून 4,83,159 युनिट्सवर पोहोचली. दुचाकी विक्री गेल्या महिन्यात 36.35 टक्क्यांनी वाढून 20,65,095 युनिट्सवर गेली. ऑक्टोबर 2023 मध्ये 15,14,634 युनिट्सची विक्री झाली. ऑक्टोबर 2024 मध्ये चाकी वाहनांमध्ये वाढ झाली.
ट्रॅक्टर विक्रीत वाढ
फाडाच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरमध्ये ट्रॅक्टरची विक्री 3.08 टक्क्यांनी वाढून 64,433 युनिट्सवर पोहोचली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात 62,542 युनिट्स होती. उद्योग मंडळाच्या मते, ऑक्टोबरमध्ये प्रमुख सण (नवरात्र आणि दिवाळी) एकत्र आल्याने ग्राहकांनी ट्रॅक्टरची मागणी वाढीवच नोंदवली आहे. आकर्षक सणासुदीच्या ‘ऑफर्स’, नवीन मॉडेल्सचे सादरीकरण आणि मुबलक स्टॉक यामुळे दुचाकींची विक्री वार्षिक 36 टक्के आणि महिन्याच्या आधारावर पाहता 71 टक्क्यांनी वाढली.
याशिवाय, ग्रामीण भागातील मागणी, अनुकूल मान्सून यामुळेही वाढीला हातभार लागला. प्रवासी वाहनांची विक्री वार्षिक 32 टक्के आणि मासिक आधारावर 75 टक्क्यांनी वाढली आहे.