रिलायन्स-डिस्ने विलीनीकरण
देशातील सर्वात मोठे मनोरंजन केंद्र बनणार : 120 चॅनेल, दोन ओटीटीसह 75 कोटी प्रेषक : नीता अंबानी अध्यक्षस्थानी
वृत्तसंस्था/ मुंबई
डिस्ने स्टार इंडिया आणि रिलायन्सच्या वायकॉम-18 आता एकत्र आले आहेत. यामध्ये डिस्ने हॉटस्टार आणि जिओ सिनेमाचाही समावेश आहे. या दोन्ही कंपन्यांनी गुरुवारी, 14 नोव्हेंबर रोजी ही घोषणा केली. या विलीनीकरणानंतर हे देशातील सर्वात मोठे मनोरंजन नेटवर्क बनले आहे.
डिस्ने-रिलायन्स एंटरटेनमेंटने आता 2 ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी आणि 120 चॅनेलसह 75 कोटी दर्शकांचा आकडा पार केला आहे. या संयुक्त उपक्रमासाठी रिलायन्सने 11,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सुमारे वर्षभर विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू होती.
दोन्ही कंपन्यांनी सांगितले- ‘हा करार 70,352 कोटी रुपयांचा आहे. विलीनीकरणानंतर, रिलायन्सकडे कंपनीत 63.16 टक्के आणि डिस्नेकडे 36.84 टक्के हिस्सेदारी असेल. नीता अंबानी या नव्या कंपनीच्या चेअरपर्सन असतील. उपाध्यक्ष उदय शंकर असतील. ते कंपनीला धोरणात्मक मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे.
नेतृत्व तीन मुख्य कार्यकारी अधिकारी करतील
या संयुक्त उपक्रमाचे नेतृत्व तीन मुख्य कार्यकारी अधिकारी करतील. हे तिघेही वेगवेगळ्dया जबाबदारी सांभाळतील. केविन वाझ मनोरंजन संस्थेचे प्रमुख असतील. डिजिटल संस्थेची जबाबदारी किरण मणी यांच्याकडे असेल. संजोग गुप्ता क्रीडा संघटनेचे नेतृत्व करणार आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, ‘या संयुक्त उपक्रमामुळे भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योग परिवर्तनाच्या युगात प्रवेश करत आहे. मी संयुक्त उपक्रमाच्या भविष्याबद्दल खूप उत्सुक आहे आणि त्याला यश मिळावे अशी माझी इच्छा आहे.’
संयुक्त उपक्रमांकडे 2 डिजिटल प्लॅटफॉर्म
या मेगा विलीनीकरणात डिस्ने स्टारचे 80 चॅनेल्स आणि रिलायन्स वायकॉम 18 चे 40 चॅनेल जोडले जातील. म्हणजेच एकूण 120 चॅनेल असतील. तथापि, यापैकी काही चॅनेल बंद केले जाऊ शकतात. दोघांकडेही ओटीटी अॅप्स आहेत डिस्ने हॉटस्टार आणि जिओ सिनेमा
रिलायन्सच्या न्यूज चॅनेल या डीलचा भाग असणार नाहीत, कारण ते नेटवर्क 18 ग्रुप अंतर्गत येतात. संयुक्त उपक्रमाला 30,000 हून अधिक डिस्ने सामग्री मालमत्तेच्या परवान्यासह डिस्ने चित्रपट आणि निर्मितीचे भारतात वितरण करण्याचे विशेष अधिकार देखील दिले जातील.