सणासुदीच्या मागणीमुळे निर्यात 28 महिन्यांमध्ये मजबूत
ऑक्टोबरमध्ये देशातून वस्तूंच्या निर्यातीचा आकडा दुहेरी : वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑक्टोबरमध्ये देशातून वस्तूंची निर्यात दुहेरी अंकांनी वाढली, गेल्या 28 महिन्यांतील सर्वात वेगवान वाढ असल्याची माहिती वाणिज्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार समोर आली आहे. यामध्ये ख्रिसमसपूर्वी पाश्चात्य देशांकडून वाढलेल्या मागणीमुळे ऑक्टोबरमध्ये निर्यात 17.3 टक्क्यांनी वाढून 39.2 अब्ज डॉलरची झाली आहे. तथापि, या कालावधीत आयात देखील 3.9 टक्क्यांनी वाढून 66.34 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचली, ज्यामुळे ऑक्टोबरमध्ये व्यापार तूट वाढून 27.1 अब्ज डॉलर झाली, जी सप्टेंबरमध्ये 20.8 अब्ज डॉलर होती.
बिगर पेट्रोलियम आणि बिगर-जेम्स आणि ज्वेलरी निर्यात ऑक्टोबरमध्ये 27.7 टक्क्यांनी वाढून 31.36 अब्जची झाली. निर्यातीत अभियांत्रिकी वस्तू (39.4 टक्के), रसायने (27.35 टक्के), इलेक्ट्रॉनिक वस्तू (45.7 टक्के), तयार कपडे (35.1 टक्के) आणि तांदूळ (85.8 टक्के) यांची मागणी वाढली आहे. दुसरीकडे, पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात 22.1 टक्क्यांनी घटून 4.6 अब्ज डॉलरवर आली आहे.
यंदाच्या वर्षाची निर्यातचांगलीच :सचिव बर्थवाल
वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सांगितले की, या वर्षीची निर्यात कामगिरी गेल्या वर्षीपेक्षा चांगली असेल आणि हीच प्रवृत्ती कायम राहिल्यास आर्थिक वर्ष 2025 मध्ये एकूण निर्यात 800 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते.
निर्यातदारांच्या संघटनेचे एफईओचे अध्यक्ष अश्विनी कुमार म्हणाले की, जागतिक अनिश्चिततेच्या काळात कमोडिटी निर्यातीतील प्रभावी दुहेरी अंकी वाढ हे प्रोत्साहनदायक सुधारणांचे लक्षण आहे. तथापि कच्च्या तेलाच्या आणि धातूंच्या किमतीतील अस्थिरतेने निर्यातीचे मूल्य काही प्रमाणात वाढवण्यातही भूमिका बजावली.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत निर्यात 3.2 टक्क्यांनी वाढून 244.5 अब्जची झाली, तर आयात 5.7 टक्क्यांनी वाढून 416.9 अब्जची झाली. त्यामुळे व्यापार तूट 164.65 अब्ज डॉलरवर राहिली.
बर्थवाल म्हणाले, विशिष्ट प्रदेश आणि देशांवर लक्ष केंद्रित करण्याची आमची रणनीती आता फायदेशीर ठरत आहे. सोन्याच्या आयातीत 1 टक्क्यांनी घट होऊनही ऑक्टोबरमध्ये 7.14 अब्ज किमतीची सोन्याची आयात झाली.
ऑक्टोबरमध्ये सेवांची निर्यात 21.3 टक्क्यांनी वाढून 34 अब्जची झाली आणि आयात 26.3 टक्क्यांनी वाढून 17 अब्जची झाली. यात, सेवांमधील व्यापारात 17 अब्ज डॉलरचा अधिशेष होता. तथापि, ऑक्टोबरमधील सेवा व्यापाराचे आकडे अंदाजे आहेत आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डेटा जारी केल्यानंतर त्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.