के.के. कोप्प गावामध्ये भटक्या कुत्र्यांसाठी पुनर्वसन केंद्र
गावात 2 एकर जागा मंजूर : ग्रामस्थांच्या विरोधामुळे उभारण्यास विलंब
बेळगाव : शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका रोखण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी के. के.कोप्प गावात भटक्या कुत्र्यांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे. शहरात दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढत चालली असल्याने मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले वाढत आहेत. दररोज चार ते पाच जणांचा कुत्र्यांकडून चावा घेतला जात आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकेने अर्थसंकल्पात 2 कोटी रुपये खर्च करून 2 एकर जागेत भटक्या कुत्र्यांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर नगरसेवकांनी आपल्या प्रभाग विकास अनुदानातून प्रत्येकी 2 लाख रुपये प्रमाणे 1.16 कोटी रुपये देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला होता. मात्र केके कोप्प ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्याने पुनवर्सन केंद्र उभारण्यास विलंब होतआहे.
दरवर्षी 25 लाख रुपये खर्च
दरवर्षी महानगरपालिका 25 हजार भटक्या कुत्र्यांपैकी केवळ 5 ते 6 हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण करत आहे. यासाठी दरवर्षी 25 लाख रुपये खर्च केले जातात. तरीदेखील कुत्र्यांचा उपद्रव मात्र कमी झालेला नाही. श्रीनगर येथील रहिवाशांकडूनदेखील तेथील एबीसी सेंटरला विरोध होत असल्याने शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या केके कोप्प गावात 2 एकर जागा मंजूर करण्यात आली आहे.