प्लास्टिक बाटल्यांबाबत लवकरच नियमावली
नियम तयार करण्याचे वनमंत्र्यांचे निर्देश : दुकानदारांना रिकाम्या बाटल्या खरेदी कराव्या लागणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
पाणी प्राशनानंतर प्लास्टिकच्या बाटल्या वाटेल तिथे फेकून देणे थांबविण्यासाठी नवी शक्कल लढविण्यात येणार आहे. पाणीविक्री करणाऱ्या दुकानांनी कमीत कमी किमतीत रिकाम्या बाटल्या खरेदी करण्यासंबंधी नियमावली तयार करण्यात येणार आहेत. तसेच बाटल्यांमधून पाणीविक्री करणाऱ्या कंपन्यावर त्या बाटल्यांची शास्त्राrय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी देखील असेल. यासंबंधी वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खंड्रे यांनी खात्याच्या अप्पर मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत. परिणामी प्लास्टिक बाटल्यांपासून होणारे धोके रोखणे शक्य होईल, असे मतही वनमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.
मातीमध्ये विघटन न होणारे, पाण्यात न विरघळणारे आणि जाळल्यानंतर वातावरणात विषारी घटकांची भर घालणारे प्लास्टिक केवळ पर्यावरणासाठीच नव्हे; तर मानवाच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यालाही हानीकारक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ‘वन टाईम युज’ प्लास्टिकचे उत्पादन, साठा, विक्री आणि वापर यावर बंदी घातली आहे. राज्य सरकारने देखील या संदर्भात कठोर नियम जारी केले आहेत. तरी सुद्धा एक वेळ वापराच्या प्लास्टिक उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. याची सरकारने गंभीर दखल घेतली आहे.
सुरुवातीला रस्त्याकडेला फेकून पर्यावरणाची हानी होणाऱ्या, मिनरल वॉटर बॉटलवर नियंत्रण आणण्याची गरज आहे. पाण्याची नवीन बाटली खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी कोणत्याही कंपनीची रिकामी बाटली दिली तरी किमान दर निश्चित करून तेवढीच किंमत नवी बाटली देताना कमी करावी. अशा रितीने जमा होणाऱ्या बाटल्या पाणीविक्री करणाऱ्या कंपन्यांनी जमा कराव्यात तसेच त्यांची शास्त्राrय पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक करावे, अशी सूचना मंत्री ईश्वर खंड्रे यांनी दिली आहे.
उत्पादकांची विस्तारित जबाबदारी (ईपीआर-एक्स्टेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत कोणत्याही प्रकारचे उत्पादन ग्राहकांच्या हाती पोहोचल्यानंतरही त्याच्या पर्यावरणीय परिणामांचे व्यवस्थापन करण्यास संबंधित कंपन्या जबाबदार असतात. त्यामुळे पाणीविक्री करणाऱ्या कंपन्यांनी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या खरेदी करून विल्हेवाट लावल्यास मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचऱ्याचा साठा नियंत्रित केला जाऊ शकतो.