अल्पसंख्याक शेतकऱ्यांना जमिनी नियमित करून प्रमाणपत्र द्या
विधानसौध परिसरात हुक्केरी तालुक्यातील मागासवर्गीय शेतकऱ्यांची मागणी
प्रतिनिधी./ बेळगाव
हुक्केरी तालुक्यात मागील 20 वर्षांपासून जमीन कसणाऱ्या मागासवर्गीय शेतकऱ्यांना ही जमीन नियमित करून प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी भीमवाद दलित संघर्ष समितीतर्फे गुरुवारी विधानसौध परिसरात आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे.
हुक्केरी तालुक्यातील गुडस, सारापूर, शिरहट्टी (बीके), हरगापूर, कोटबागी, शिगढाण, रक्षी, इंगळी, यरगट्टी, बेळवी, होसूर आदी गावांमध्ये मागील 20 अनुसूचित जाती-जमातीतील शेतकरी जमीन कसत आहेत. या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या शेतीवरच चालतो. ही जमीन या शेतकऱ्यांना नियमित करून याबाबत लागवडीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री, महसूलमंत्री, जिल्हा पालकमंत्र्यांनाही अनेकवेळा निवेदन देण्यात आले आहे.
लागवडीचा दाखला दिला जात नसल्याने अडचणी
येथील शेतकऱ्यांना लागवडीचा दाखला दिला जात नसल्याने अडचणी येऊ लागल्या आहेत. शासकीय सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत तहसीलदार आणि महसूल खात्याकडेही वारंवार मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना या जमिनी नियमित कराव्यात आणि याबाबत लागवडीचे प्रमाणपत्रही देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.