मातीचा बंधारा घालून रंकाळ्यातील सांडपाणी रोखा
कोल्हापूर :
रंकाळा तलावाबाबत कोल्हापूरसह पर्यटकांच्या भावना तीव्र आहेत. रंकाळ्यामध्ये सांडपाणी मिसळून प्रदूषण होणे आणि मासे मृत्यूमुखी पडणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. रंकाळा प्रदूषण प्रश्न गांभीर्याने घ्या, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महापालिका यांच्यामध्ये या प्रश्नाचा फुटबॉल होऊ नये, अशा सक्त सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. शाम सोसायटी येथील बंधाऱ्याचे पाणी रंकाळ्यात मिसळत आहे, हे रोखण्यासाठी मत्स्य केंद्रानजीक तात्पुरत्या स्वरुपाचा मातीचा बंधारा घालून तेथील पाणी उपसण्याचे आदेशही क्षीरसागर यांनी दिले.
रंकाळा येथे सांडपाणी मिसळून तलावातील मासे मृत्यूमुखी पडल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. तसेच रंकाळा तलावाच्या विविध कामांची पाहणी मंगळवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जलअभियंता हर्षजीत घाटगे, अभियंता महादेव फुलारी, किशोर घाटगे, शिवसेना वैद्यकीय मदत केंद्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्यासह अधिकारी नागरिक उपस्थित होते.
रंकाळा टॉवर येथे विविध नागरिकांनी रंकाळा तलावावरील विविध समस्यांचा पाढा आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमोर वाचला. यामध्ये तलावावर वॉचमन नसणे, माळी नसणे, कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचे प्रश्न उपस्थित केले. तसेच रंकाळा टॉवर समोरील दोन इमारतींमध्ये महापालिकेच्या मालकीचे दोन पार्किंग आहेत. हे पार्किंग अद्यापही महापालिकेने का खुले केले नाहीत असा सवाल रंकाळा प्रेमींच्या वतीने उपस्थित करण्यात आले. रंकाळ्यावर मद्यपींचा वावर झाला असून, पोलीस यंत्रणेने या ठिकाणी गस्त घालण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
- समिती नेमूया
रंकाळा राजघाट येथे रंकाळा प्रेमींनी रंकाळ्यावरील अनेक प्रश्नांबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांचे लक्ष वेधले. यावेळी विविध प्रश्न हे बिनखर्चाचे सुटण्यासारखे आहेत. या प्रश्नांचा एक अहवाल तयार करु, याबाबत महापालिकेत स्वतंत्र्य बैठक लावूया तसेच रंकाळा संवर्धन, जतन आणि संरक्षणासाठी स्थानिक नागरीक आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करुया अशी सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी मांडली.
- तटबंदीला भेगा
रंकाळ्याचे सुशोभिकरण चांगल्या पद्धतीने झाले आहे. नेत्रदिपक रोषणाई झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत पर्यटकांचा ओघ रंकाळ्याकडे असतो. मात्र रंकाळा तलावाच्या तटबंदीला काही ठिकाणी भेगा गेल्या आहेत, राजघाटानजीक असणाऱ्या दगडी कमानीही निखळल्या आहेत. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करुन द्या नियोजन मंडळामधून निधी देण्याचे आश्वासन आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले.
- तात्पुरत्या स्वरुपात मातीचा बांध
यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी शाम सोसायटीच्या ओढ्यानजीक पाहणी केली. मत्सकेंद्रानजीक ओढ्याचे सांडपाणी रंकाळ्यामध्ये मिसळत असल्याचे प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची विचारणा आमदार राजेश क्षीरसागर यांनी जलअभियंता हर्षजीत घाटगे यांना केली. यावर शाम सोसायटीचे पाणी पावसाळ्यामध्येच रंकाळ्यात मिसळते. यावर्षी आतापर्यंत तीनवेळा अवकाळी पाउस झाल्याने ओढ्याला प्रवाह अधिक होता. पाणी शाम सोसायटीच्या बंधाऱ्याजवळ अधिक प्रमाणामध्ये अडवले तर, हेच पाणी परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये शिरते. यामुळे बंधाऱ्यावर अधिक पाणी अडविण्यास मर्यादा येत आहेत. सकाळी ओढ्याला पाण्याचा प्रवाह अधिक असतो यामुळे काहीवेळा पाणी रंकाळ्यात मिसळते, मात्र हे प्रमाण कमी असल्याचे सांगितले. यावरही उपाययोजना सुरु असल्याचे घाटगे यांनी सांगितले. तात्पुरत्या स्वरुपात मत्सकेंद्रानजीक मातीचा मोठा बंधारा बांधून रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्यात येणार आहे. हे पाणी मोटारीद्वारे उपसा करुन दुधाळी सांडपाणी प्रकल्पाकडे वळवण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे जलअभियंता हर्षजीत घाटगे यांनी सांगितले.
- शाम सोसायटी येथे एसटीपी प्लँटचा प्रस्ताव द्या
शाम सोसायटी येथे महापालिकेच्या मालकीची जागा आहे. यामध्ये महापालिका एसटीपी प्लँट उभारु शकते. याचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत आणि जलअभियंता हर्षजीत घाटगे यांनी सांगितले. यावर एसटीपी प्लँटचा प्रस्ताव तातडीने द्या याला निधी देऊ अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.