For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रादेशिक योजना जुनी नव्हे; भाजप सरकारच कालबाह्या !

01:12 PM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रादेशिक योजना जुनी नव्हे  भाजप सरकारच कालबाह्या
Advertisement

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची टीका

Advertisement

पणजी : नगरनियोजन खात्याचे मंत्री विश्वजित राणे म्हणतात की, प्रादेशिक योजना जुनी आहे. परंतु मंत्री राणे हे दिशाभूल करण्यात पटाईत आहेत. कारण ही योजना जुनी नसून, प्रत्यक्षात भ्रष्ट भाजप सरकारच कालबाह्य झाले आहे. राज्याच्या जनतेला आता केवळ काँग्रेस सरकारचीच गरज आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. पणजी येथील काँग्रेसच्या कार्यालयात काल सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पाटकर यांनी भाजपवर शरसंधान साधले. यावेळी उत्तर गोवा काँग्रेसचे अध्यक्ष विरेंद्र शिरोडकर, काँग्रेस गटाध्यक्ष मनोज पालकर, नारायण रेडकर, अतुल नाईक व पीटर फर्नांडिस उपस्थित होते.

पाटकर पुढे म्हणाले, नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे नाव घेऊन त्यांनी स्वत:ला केलेल्या फोन कॉलचा उल्लेख केला. परंतु मंत्री राणे यांना आपण स्पष्टपणे सांगू इच्छितो की, बेकायदेशीर जमीन रूपांतरण आणि डोंगर कापणीच्या मुद्यांवर आपण गप्प बसणार नाही. कारण गोव्यातील सर्व डोंगर सपाट करण्याचा घाट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री राणे यांनी घातलेला आहे. जर गोव्याला कुणी उद्ध्वस्त करू पाहत असेल, तर काँग्रेस पक्ष कधीच सहन करणार नाही, असा इशाराही पाटकर यांनी दिला.

Advertisement

भ्रष्ट नेते भाजपमध्येच

राज्यात सत्तेवर असलेला भाजप पक्ष आज म्हणत आहे की, माजी मुख्यमंत्री आणि माजी नगरनियोजन मंत्र्यांनी जमिनीचे बेकायदेशीरपणे रूपांतर केलेले आहे. सध्याच्या भाजप सरकारचा यामध्ये कोणताही सहभाग नाही, असे वारंवार मंत्री विश्वजित राणे सांगत आहेत. परंतु हे सर्व नेते भाजप सरकारमध्येच आहेत. आमदार दिगंबर कामत, बाबुश मोन्सेरात, बाबु कवळेकर हे सर्व नेते भाजपमध्ये असल्यानेच भाजपने साधेपणाचा आव आणू नये, असे पाटकर म्हणाले.

काँग्रेस लढण्यास तयार

काँग्रेस पक्ष गणेशचतुर्थीनंतर गोव्यातील प्रत्येक गावात जाऊन बेकायदेशीर डोंगर कापणी आणि जमीन ऊपांतरणाचे मुद्दे घेऊन लढा देण्यास तयार आहे. गोव्यातील प्रत्येक गावात जाऊन परिवर्तनाचे नारे दिले जातील आणि राज्यातील डोंगर सुरक्षित राहण्यासाठी काँग्रेस पक्ष लढण्यासाठी तयार आहे, असेही पाटकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.