इस्कॉनवर बंदी घालण्यास नकार
बांगलादेश उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
वृत्तसंस्था/ढाका
इस्कॉन या हिंदू धार्मिक संस्थेवर बंदी घालण्यास बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ही संघटना कट्टरवादी आहे, असा आरोप करत तिच्यावर बंदी घालण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका दोन दिवसांपूर्वी ढाका येथील उच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. तथापि, उच्च न्यायालयाने ही मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे. या संस्थेच्या बांगलादेशविरोधी कारवायांना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना केली आहे. या संस्थेच्या काही नेत्यांवर कायदेशीर कारवाई होत आहे, असा युक्तिवाद बांगलादेश प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता. सरकारने या संस्थेच्या विरोधात चौकशी करण्याचे आणि योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने या संस्थेवर बंदी घालण्याची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने त्याच्या गुरुवारी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
इस्कॉनला क्लिनचिट नाही
इस्कॉन ही संस्था निर्दोष असल्याने तिच्यावर बंदी घालण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे, असा या निर्णयाचा अर्थ होत नाही. बांगलादेश सरकारने या संस्थेच्या हालचालींची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्याचे कारण राहिलेले नाही, इतकेच न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याचा अर्थ या संस्थेला न्यायालयाने संरक्षण दिले आहे असा होत नाही. तसेच सरकारने या संस्थेच्या विरोधात सुरु केलेली कारवाई चुकीची आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केलेले नाही. तरीही, हा एक मर्यादित दिलासा तेथील न्यायालयाने हिंदूंना दिल्याचे मानण्यात येत आहे.
प्रकरण काय आहे...
बांगलादेशातील इस्कॉन या हिंदू धार्मिक संस्थेचे माजी प्रमुख चिन्मोय कृष्ण दास यांना बांगलादेश सरकारने काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. त्यांना विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर देशविरोधी कृत्ये केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यांना जामीनही नाकारण्यात आला आहे. या घटनेनंतर बांगलादेशातील हिंदू समाजाने उग्र आंदोलन हाती घेतले आहे. हिंदूंनी ढाक्यात काढलेल्या अतिविशाल मोर्चावर तेथील मुस्लीम धर्मांधांनी हल्ला चढविला होता. त्यात अनेक लोक जखमी झाले. दास यांच्या अटकेचा आणि त्यानंतर हिंदूंविरोधात करण्यात येत असलेल्या अत्याचारांचा तीव्र निषेध अनेक देशांनी केला आहे.
भारताकडूनही तीव्र निषेध
बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार गेल्यापासून तेथील हिंदूंवरच्या अत्याचारात कमालींची वाढ झाली आहे. भारताने या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला असून बांगलादेशला हे अत्याचार त्वरित थांबवावेत असा इशारा दिला आहे. भारताने या प्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी हिंदू संघटनांकडून होत आहे.