‘मार्कंडेय’ नदी पात्रातील पाणीसाठ्यात घट
दिवसेंदिवस घट होत असल्याने नदीचे पात्र कोरडे पडण्याची भीती : शेतकरी वर्गासह नागरिकांतून पाणी समस्येची चिंता
वार्ताहर/उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागातील हजारो एकर जमिनीतील पिकांची आणि जनतेची जीवनदायींनी ठरलेल्या मार्कंडेय नदीच्या पात्रातील पाण्याचा साठा दिवसेंदिवस कमी कमी होत चालल्याने नजीकच्या काळात नदीचे पात्र कोरडे पडेल, अशी भीती शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे. तरी तातडीने सुळगा(हिं.)येथे असलेल्या बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडवावे, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. मार्कंडेय नदीच्या पात्रातील पाणी हे या भागातील तमाम जनतेची जीवनदायीनीच आहे. शेतकऱ्यांच्या शेतवडीतील पिकाबरोबरच, या संपूर्ण भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या विहिरीना नदीचे पात्र भरलेले असेल तरच पाझर असतो. आणि विहिरीतील पाणीसाठा टिकून राहतो. मात्र येत्या नजीकच्या काळात नदीचे पात्र कोरडे पडले तर मात्र तीव्र पाण्याची समस्या भासू लागणार असल्याचे संकेत या भागात निर्माण झाले आहेत. बेळगावच्या पश्चिम भागातून अनेक गावे आणि शेतवडीतून जाणारी मार्कंडेय नदी ही या भागाला लाभलेले एक वरदानच आहे.
नदीच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर जमिनीमध्ये आता बटाटे, मका, ऊस, मिरची, सूर्यफूल आणि वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला अशी अनेक पिके सध्या या नदीच्या पात्रातील पाण्यावरतीच तग धरून असतात. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून नदीच्या पात्रातील पाण्याचा साठा कमी कमी होत चालल्याने नजीकच्या काळात नदीचे पात्र कोरडे पडेल, या भीतीने शेतकरी आणि नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. नदीचे पात्र कोरडे झाले तर या भागातील असंख्य शेतकऱ्यांना शेतातील पिकाला पाणी कसे द्यावे, याची चिंता लागून राहिली आहे. या नदीच्या पात्रातील पाण्यावरती आतापर्यंत अनेक पिके शेतकऱ्यांनी घेतली. मात्र आता शेतवडीतील या पिकांचे पुढे काय करायचे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. जर नदीच्या पात्रात पाण्याचा साठा एप्रिलपर्यंत टिकून राहिला तर मिरचीसह अनेक भाजीपाला पीक मोठ्या प्रमाणात या भागात शेतकरी घेत असतो. मात्र दरवर्षी मार्च महिन्यामध्ये या नदीचे पात्र कोरडे पडते आणि शेतातील पिकांना पाणी नसल्याने पिके करपू लागतात. यासाठी मार्कंडेय नदीत पाण्याचा साठा मे अखेरपर्यंत टिकून राहणे हे अतिशय गरजेचे आहे.
प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज
मार्कंडेय नदीच्या पात्रात पाणी राहिले तर या भागातील प्रत्येक गावामधून असलेल्या सार्वजनिक विहिरीमधील पाण्याचा साठाही टिकून राहतो. आणि पिण्याच्या पाण्याचेही हाल नागरिकांना सहन करावे लागत नाही. त्यामुळे या भागात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने आतापासूनच खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मार्कंडेय नदीमध्ये तिलारीतील पाण्याची प्रतीक्षा
मार्कंडेय नदीची पाणीपातळी आटत चालली आहे. जर तिलारी धरणातील पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात आले तर या भागातही पाण्याची समस्या कधीच भेडसावणार नाही. तसेच बेळगाव शहराला पाणीपुरवठा हिंडलगा पंपिंग स्टेशनवरून केला जातो. जर मार्कंडेय नदीच्या पात्रात पाण्याचा साठा भरपूर असेल तर बेळगाव शहरालाही पिण्याच्या पाण्याची कधीच टंचाई भासणार नाही. यासाठी अनेकवेळा या संदर्भात चर्चा करण्यात येत आहेत. मात्र तिलारीच्या धरणातील पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात सोडण्यासाठी वेगवान हालचाली कोणाकडूनही होत नाहीत. यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. तरी शासनाने याचा तातडीने विचार करून मार्कंडेय नदीच्या पात्रातही पाणीसाठा कसा जास्त टिकून राहील यासाठी प्रयत्न करावेत, अशी जोरदार मागणी या भागातील शेतकरी नागरिकांतून करण्यात येत आहे.
ताम्रपर्णी नदीला वर्षभर पाणी
बेळगाव तालुक्यालगतच असलेल्या चंदगड तालुक्यातील अनेक भागातून जाणाऱ्या ताम्रपर्णी नदीच्या पात्रात जगमंट्टी धरणातील पाणी सोडले जाते. यामुळे नदीचे पात्र उन्हाळा, पावसाळा काठोकाठ भरून असते. परिणामी या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या शेती आणि पिण्यासाठी कधीच भासत नाही.