For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दूध दरात घट : संकलन केंद्राला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे

10:10 AM Feb 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
दूध दरात घट   संकलन केंद्राला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे
Advertisement

अलतगा येथील गोकुळ संघाच्या दूध संकलन केंद्राच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव : दर वाढवून देईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

Advertisement

वार्ताहर /कडोली

कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाने कोणतीही पूर्वसूचना न देता गेल्या दि. 1 फेब्रुवारीपासून म्हैस आणि गायीच्या दूध दरात कमी केल्याने सीमाभागातील संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अलतगा येथील गोकुळ संघाच्या संकलन केंद्राला टाळे ठोकून दुधाचे दर वाढवून देण्याची मागणी केली. कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाच्यावतीने सीमाभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दुधाची खरेदी केली जाते. गोकुळ दूध संघाने दुग्ध उत्पादकांना सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन दुग्ध उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले होते. परंतु गेल्या 1 फेब्रुवारीपासून म्हैस दूध दरात 3 रु. 50 पैसे तर गायीच्या दुध दरात 4 रु. 50 पैसे लिटरमागे कमी केल्याने शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गोकुळने आपल्या कार्यक्षेत्राबाहेरच्या दुधाचे दर कमी केले आहेत. परिणामी आमच्या सीमाभागावर याचा मोठा अन्याय झाला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दूध उत्पादकांतून व्यक्त होत आहे.

Advertisement

शुक्रवारी सकाळी संतप्त दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी अलतगा येथील गोकुळच्या श्री ब्रम्हलिंग दुग्ध उत्पादक संघाच्या दूध संकलन केंद्राला घेराव घालून तेथील विस्तार अधिकारी निवृत्ती हाकारे यांना जाब विचारला. यावेळी विस्तार अधिकाऱ्यांनी तात्काळ गोकुळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिली. परंतु संतप्त दुग्ध उत्पादकांनी जोपर्यंत दूध दर वाढीचा निर्णय होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहणार, असे ठासून सांगितले. अलतगा येथील या संकलन केंद्राला दूध पुरवठा करणाऱ्या सीमाभागातील 70 हून अधिक दूध डेअरीच्या 500 शेतकऱ्यांनी भाग घेऊन आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दिवसेंदिवस पशुखाद्याचे दर वाढत आहेत. त्यामुळे दूध उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत जर दुधाचे दर कमी झाले तर दुग्ध उत्पादक शेतकरी तग धरू शकेल काय? बिसलरी पाणी जास्त दरात खरेदी करावे लागतं तर दुधाला का तसा दर मिळत नाही, अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांतून केली जात होती.

Advertisement
Tags :

.