‘रेड अलर्ट’ जारी, मुसळधार पावसाची शक्यता
पणजी : आगामी 24 तासात राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून सर्वत्र सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केला आहे. तथापि सरकारने शाळांना सुट्टी दिलेली नाही. गेल्या 24 तासात गोव्यात सरासरी चार इंच पावसाची विक्रमी नोंद झाली. बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्याचा गोव्यावर गंभीर परिणाम झालेला असून मान्सून फारच सक्रिय झालेला आहे. तसेच अरबी समुद्रात देखील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी गोव्यात आगामी दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. बुधवारी ऑरेंज अलर्ट होता. आज गुऊवारी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी केला आहे. उद्या शुक्रवारी जोरदार वादळी वाऱ्याबरोबरच मुसळधार पाऊस होणार आहे.
गेल्या 24 तासात गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. सर्वाधिक पावसाची नोंद दाबोळी येथे झाली असून तिथे साडेचार इंच पाऊस पडला. मुरगाव 4.15 इंच, पणजी चार इंच, जुने गोवे जवळपास चार इंच, काणकोण पावणेचार इंच, फोंडा पावणे चार इंच, मडगाव साडेतीन इंच, म्हापसा तीन इंच, धारबांदोडा येथे अडीच इंच व साखळी येथे अडीच इंच पावसाची नोंद झाली. पेडणेमध्ये दोन इंच पाऊस पडला. उत्तर गोव्यात गेल्या 24 तासात तीन इंच तर दक्षिण गोव्यात पावणे चार इंच पाऊस नोंदविला गेला. त्यामुळे सरासरी साडेतीन इंच पावसाची नोंद संपूर्ण गोव्यात झाली. यामुळे यंदाच्या पावसाची आतापर्यंतची नोंद 71.50 इंच एवढी झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत यंदा साडेपाच टक्क्यांनी पाऊस पुढे आहे. धारबांधोडा येथे पडलेल्या अडीच इंच पावसानंतर तेथे आतापर्यंत पडलेल्या पावसाची नोंद 98 इंच झाली आहे.