टॅटेस्टिक मीटर बसविताना खुशालीच्या नावे वसुली सुरूच
नानावाडी-वडगाव येथील प्रकार
बेळगाव : हेस्कॉमकडून स्टॅटेस्टिक मीटर बसविले जात आहेत. परंतु, बसविणाऱ्या कंत्राटी कामगारांकडून खुशालीच्या नावाखाली 300 ते 400 रुपये वसूल केले जात आहेत. अनेक तक्रारी करूनदेखील हेस्कॉमकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने दाद मागायची कोणाकडे? असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. जुने मीटर बदलून त्या ठिकाणी नवे स्टॅटेस्टिक मीटर बदलले जात आहे. शहराच्या अनेक भागात मीटर बदलण्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित भागांमध्ये काम सुरू आहे. बेंगळूर येथील एका कंपनीला मीटरचे कंत्राट देण्यात आले आहे. परंतु, कंत्राटी कामगारांकडून मीटर बदलल्यानंतर 200 ते 300 रुपये खुशाली सक्तीने वसूल केली जात आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करून देखील हेस्कॉमकडून मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. मागील चार दिवसात नानावाडी, रयत गल्ली-वडगाव या परिसरात मीटर बसवताना पैशांची मागणी करण्यात आली. वास्तविक पहाता ज्या परिसरात मीटर बदलले जाणार आहे, त्या त्या ठिकाणी हेस्कॉमने आपले कर्मचारी नेमणे गरजेचे आहे. बऱ्याच अपार्टमेंटमध्ये कंत्राटी कामगारांना घेतले जात नसल्याने हेस्कॉमचे कर्मचारी सोबत असताना वादावादीचे प्रकार कमी करण्याबरोबरच नागरिकांची लुबाडणूक होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मीटर बसविल्यानंतर खुशाली देऊ नका
मीटर बसवताना कंत्राटी कामगारांकडून खुशाली मागितली जात असल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. आम्ही संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. नागरिकांनी मीटर बसविल्यानंतर कोणत्याही प्रकारची खुशाली देऊ नये, असे आवाहन केले आहे.
ए. एम. शिंदे (प्रभारी कार्यकारी अभियंता, हेस्कॉम)