मालूर मतदारसंघात 11 नोव्हेंबर रोजी फेरमतमोजणी
राज्य निवडणूक आयोगाची कोलार जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
बेंगळूर : तीव्र कुतूहल निर्माण झालेल्या कोलार जिल्ह्याच्या मालूर विधानसभा मतदारसंघातील फेरमतमोजणीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंबंधी कोलार जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून 11 नोव्हेंबर रोजी फेरमतमोजणी करण्याची सूचना दिली आहे. मालूर मतदारसंघातील पराभूत उमेदवार मंजुनाथ गौडा यांनी फेरमतमोजणीची मागणी करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तहसीलदारांनी काही निवडणूक साहित्य बेकायदेशीरपणे जप्त केल्याबद्दलही त्यांनी आवाज उठवला होता. शिवाय त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून ही बाब निदर्शनास आणून दिली होती.
आता निवडणूक आयोगाने कोलार जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून 11 नोव्हेंबर रोजी फेरमतमोजणी करण्याची सूचना दिली आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत के. वाय. नंजेगौडा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीत विजय मिळविला होता. मात्र, मतमोजणी योग्यरित्या झाली नाही, नियमांचे उल्लंघन झाले आहे, असा आरोप करत मंजुनाथ गौडा यांनी नंजेगौडा यांची निवड अवैध ठरवावी, अशी मागणी केली होती. उच्च न्यायालयाने नंजेगौडा यांची निवड अवैध ठरवत फेरमतमोजणीचे आदेश दिले होते. या आदेशाला नंजेगौडा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने नंजेगौडा यांची निवड अवैध ठरविण्याच्या आदेशाला स्थगिती दिली तसेच फेरमतमोजणीचा आदेश निवडणूक आयोगाला दिला होता.