इंग्लंड महिला संघाचा विक्रमी विजय
सामनावीर टॅमी ब्युमाँट : नाबाद 150 धावा, केट क्रॉस : 8 धावांत 3 बळी
वृत्तसंस्था / बेलफास्ट
इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ सध्या आयर्लंडच्या दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने आयर्लंडचा 275 धावांनी दणदणीत पराभव केला. या मालिकेत इंग्लंडने आता आयर्लंडवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. इंग्लंड संघातील टॅमी ब्युमॉन्टला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. ब्युमॉन्टने नाबाद दीड शतकी खेळी केली.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 320 धावा जमविल्या. त्यानंतर आयर्लंडचा डाव 16.5 षटकात 45 धावांत आटोपला. इंग्लंड महिला संघाचा वनडे क्रिकेटमधील हा विक्रमी विजय आहे.
इंग्लंडच्या डावामध्ये सलामीच्या ब्युमॉन्टने 139 चेंडूत 1 षटकार आणि 16 चौकारांसह नाबाद 150 तर केम्पने 47 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 65, व्हिलेर्सने 2 चौकारांसह 14, वाँगने 1 षटकारासह 15 धावा जमविल्या. इंग्लंडला 24 अवांतर धावा मिळाल्या. इंग्लंडच्या डावामध्ये 4 षटकार आणि 32 चौकार नोंदविले गेले. केम्प आणि ब्युमॉन्ट या जोडीने चौथ्या गड्यासाठी 101 धावांची शतकी भागिदारी केली. आयर्लंडतर्फे किली, सार्जंट यांनी प्रत्येकी 2 तर टेक्टर, जेनी मॅग्युरी आणि अॅमी मॅग्युरी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या भेदक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर आयर्लंडचा डाव केवळ 16.5 षटकात 45 धावांत उखडला. त्यांच्या डावामध्ये सलामीच्या होएने दुहेरी धावसंख्या गाठताना 37 चेंडूत 2 चौकारांसह 22 धावा जमविल्या. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. आयर्लंडच्या डावात 3 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे केट क्रॉस आणि फिलेर यांनी प्रत्येकी 3 तर केम्प आणि डेव्हीस यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: इंग्लंड 50 षटकात 8 बाद 320 (टॅमी ब्युमॉन्ट नाबाद 150, केम्प 65, लॅम्ब 18, अॅमीटेज 19, व्हिलेर्स 14, वाँग 15, अवांतर 24, किली व सार्जंट प्रत्येकी 2 बळी, टेक्टर, जेनी मॅग्युरी व अॅमी मॅग्युरी प्रत्येकी 1 बळी), आयर्लंड 16.5 षटकात सर्वबाद 45 (युना होए 22, केट क्रॉस 3-8, फिलेर 3-10, केम्प 2-7, डेव्हीस 2-14)