केएमएफकडून विक्रमी उलाढाल
बेंगळूर : राज्यात दूध उत्पादनात वाढ झाल्यामुळे कर्नाटक दूध महामंडळाने (केएमएफ) विविध पदार्थांचे उत्पादन करून देशभरात विक्री सुरू केली आहे. यंदा दसरा आणि दिवाळीच्या कालावधीत केएमएफने विक्रमी 1,100 मेट्रिक टन गोड पदार्थांची विक्री करून 46 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. पशुसंगोपन मंत्री के. वेंकटेश यांनी मंगळवारी ही माहिती दिली. 2024 सालातील दसरा आणि दिवाळीत केएमएफने आपल्या नंदिनी ब्रँडच्या एकूण 725 मेट्रिक टन गोड पदार्थांची विक्री केली होती. मागील वर्षी या दोन सणांच्या कालावधीत 33.48 कोटी रुपयांची उलाढाल केली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 38 टक्के अधिक प्रगती साधली आहे.
केएमएफच्या इतिहासातील हा सर्वकालीन विक्रम आहे. यंदाच्या दसरा आणि दिवाळीत केएमएफने वाढत्या मागणीचा विचार करून दोन महिने अगोदर आपल्या सर्व दूध वितरण संघांच्या मदतीने ठोस योजना आखून 1000 मे. टन गोड पदार्थ विक्रीचे उद्दिष्ट बाळगले होते, अशी माहिती वेंकटेश यांनी दिली. राज्यात दररोज सरासरी 1 कोटी लिटर दूध संकलन होते. त्यापैकी 65 लाख लिटर दूध, दही आणि युएचटी दूध उत्पादने राज्यात व परराज्यातील बाजारपेठेत ग्राहकांना उपलब्ध केले जाते. या ब्रँडच्या दुधाबरोबरच तूप, लोणी, पनीर, गोड पदार्थ, दूध पावडर, शितपेयांसह 17 हून अधिक प्रकारची दुग्धोत्पादने आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगण, महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि इतर राज्यांमध्ये यशस्वीपणे विक्री केली जात आहे, असेही ते म्हणाले.