‘सॉफ्ट टॉईज’चा विक्रम
कोणता ना कोणता विक्रम करुन प्रसिद्धीच्या झोतात यायचे, ही सवय अनेकांना आहे. असे लोक विक्रमांसाठी नवनवे विषय शोधत असतात. गिनीज विक्रम पुस्तिकेत अशा विक्रमांची नोंद केली जाते. अमेरिकेच्या इलिनॉईस प्रांतात वास्तव्यास असणाऱ्या साबरिना डॉसमॅन नामक महिलेने असाच एक विक्रम केला असून तिचे नाव गिनीज विक्रम पुस्तिकेत नोंद करण्यात आले आहे.
या महिलेने सॉफ्ट टॉईज (लहान मुलांसाठीची कापडाची खेळणी) संग्रहणाचा विक्रम केला आहे. तिच्याकडे एकंदर 1 हजार 523 खेळणी आहेत. तिच्याजवळ जितकी ‘स्क्विशमॅलो’ आहेत, तितकी जगात अन्यकोणाजवळ नाहीत. अशा प्रकारची खेळणी 2017 मध्ये केली टॉईज होल्डिंग एलएलसीने बाजारात आणली होती. ही कंपनी अल्पावधीच तिच्या कल्पक खेळण्यांमुळे प्रसिद्ध झाली होती. साबरिना डॉसमॅनकडे अशा प्रकारची इतकी खेळणी आहेत, की तिने ती आपल्या घराच्या सर्व खोल्यांमध्ये ठेवलेली आहेत. ‘स्क्विशमेलो’ खेळण्यांच्या संगहणाची त्यांना विशेष आवड आहे. त्यामुळे गिनीज विक्रमपुस्तिकेत नाव नोंद झाल्यानंतरही आपण या खेळण्यांचा संग्रह करत राहणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ही खेळणी विकत घेण्यासाठी त्यांना कित्येकदा दोन दोन तासांचा प्रवास करावा लागतो. त्यांनी हा संग्रह करण्यास 2018 पासून प्रारंभ केला आणि अवघ्या सहा वर्षांमध्ये गिनीज विक्रम पुस्तिकेत प्रवेश मिळविला. अशा खेळण्यांचा संग्रह करणे ही जणू त्यांची ‘मानसिक’ आवश्यकता बनली आहे. नवनवी खेळणी संग्रहित केल्यावाचून त्यांना करमत नाही, असे त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. त्यांचा संग्रह पाहिलेल्या अनेकांनी त्यांचे यासाठी कौतुक केले आहे.