...आणि विमान परतले अर्ध्यावरुनच !
अलिकडच्या काळात विमान प्रवासाचे प्रमाण बरेच वाढलेले आहे. मात्र, काहीवेळा विमानाचे उ•ाण झाल्यानंतर आणि काहीकाळ त्याने प्रवास केल्यानंतर ते माघारी वळविले जाते. अशावेळी प्रवासी विमानकंपनीवर संतापतात कारण त्यांची कोणतीही चूक नसताना त्यांचा वेळ वाया गेलेला असतो. बहुतेकवेळा सुरक्षेच्या कारणास्तव, अफवांमुळे किंवा विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान मागे फिरविले जाते. पण अमेरिकन एअरलाईन्सचे एक विमान मागे फिरविण्यात आले ते एका आश्चर्यकारक कारणास्तव अर्ध्यावरुनच मागे वळविण्यात आले.
काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना आहे. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातून या विमानाचा प्रवास दक्षिण कोरियाकडे होत होता. जवळपास पाच तासांच्या प्रवासानंतर एक महत्वाची बाब विमान कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. पण ती प्रवाशांसमोर घोषित करणे विमान कंपनीच्या प्रतिष्ठेला धोकादायक आहे, असे त्यांना वाटले. त्यांनी विमान परतविण्यासाठी एक अद्भूत शक्कल लढविली. विमानाच्या चालकाने स्क्रू-ड्रायव्हर आहे का, अशी विचारणा केली. अर्थातच ही वस्तू कोणाकडे नव्हती. काहीवेळात विमान पुन्हा टेक्सासकडे परतविण्याचा निर्णय घेण्यात येऊन परतीच्या प्रवासास प्रारंभ झाला. विमानाच्या चालकाने प्रवाशांकडे स्कू-ड्रायव्हरची मागणी केल्याने, विमानात काही तरी तांत्रिक दोष निर्माण झाला असेल, अशी प्रवाशांची समजूत झाली. त्यांनी फारशी खळखळ केली नाही.
पण विमान मागे फिरविण्याचे कारण वेगळेच होते. विमानातील शौचालयात काही बिघाड झाला होता आणि त्यामुळे त्याचा उपयोग करता येण्याजोगा नव्हता. म्हणून ते मागे फिरविण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कारण टेक्सास ते दक्षिण कोरिया हा प्रवास खूपच लांबचा असल्याने प्रवाशांना शौचालयात जावे लागणारच होते. पण हे कारण स्पष्ट केले असते, तर प्रवासी संतापले असते. कारण टेक्सास येथून विमान सुटण्यापूर्वीच शौचालयाची दुरुस्ती का केली नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला असता. त्यामुळे चालकाने स्कू-ड्रायव्हरची मागणी करुन विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे सूचित केले आणि प्रवाशांनीही मग आक्षेत घेतला नाही. थोडक्यात, खरे कारण लपविण्यासाठी एका खोट्या कारणाचा आभास निर्माण करण्यात आला. तथापि, विमान परतल्यानंतर काही दिवसांनी खरी बाब उघड झाली. प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली, पण तोपर्यंत बराच काळ गेला होता.