वैवाहिक सहचर्याचा विक्रम
‘विवाह’ हा मानवाच्या आयुष्यातील सर्वोत्तम संस्कार आहे. विवाहामुळे मानवी जीवनाला परीपूर्णता प्राप्त होते, असे मानले जाते. त्यामुळे आपले वैवाहिक जीवन अधिकाधिक काळापर्यंत रहावे, असे प्रत्येक दांपत्याला वाटते. अमेरिकेत असे एक दांपत्य आहे. या दांपत्याने वैवाहिक सहचर्याचा नवा विक्रम नोंदविला आहे. इलेनोर गिटेन्स आणि लाईल गिटेन्स अशी या पतीपत्नींची नावे आहेत. इलेनोर गिटेन्स यांचे वय 107 वर्षांचे असून लाईल यांचे वय 108 वर्षांचे आहे. वयाची शंभरी ओलांडल्यानंतरही या दोघांचीही प्रकृती सुदृढ आहे, हे त्यांचे वेशेष भाग्य आहे.
त्यांच्या वैवाहिक सहचर्याला नुकतीच 83 वर्षे उलटून गेली आहेत. गेली 83 वर्षे आमचे एकमेकांवरील प्रेम टिकून राहिले, हेच आमच्या प्रदीर्घ वैवाहिक सहचर्याचे रहस्य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. हे जोडपे अमेरिकेतील मियामी या प्रांतातील असून नुकताच त्यांचा प्रदीर्घ वैवाहिक जीवनाचा विक्रम करण्यासाठी सत्कार करण्यात आला आहे. या दोघांची एकमेकांशी प्रथम भेट कशी झाली, ही घटनाही स्वारस्यपूर्ण आहे. त्यांची प्रथम भेट 1941 मध्ये एका महाविद्यालयीन बास्केट बॉल सामन्याच्या वेळी झाली. लाईल हे त्या सामन्यातील खेळाडू होते तर इलेनोर या प्रेक्षक म्हणून सामना बघण्यासाठी आल्या होत्या. लाईल यांचा खेळ इलेनोर यांना आवडल्याने त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. नंतर दोघांचा परिचय झाला आणि त्यांनी 4 जून 1942 या दिवशी विवाह केला. तेव्हा लाईल हे सैनिकी प्रशिक्षण घेत होते. त्यांना विवाहासाठी सैनिकी प्रशिक्षणातून केवळ 3 दिवस सुटी मिळाली होती. विवाहानंतर लाईल यांच्या अमेरिकन सेनेचे सैनिक म्हणून इटलीला पाठवणी करण्यात आली. ते दिवस दुसऱ्या महायुद्धाचे होते. लाईल हे त्यांचे सैनिकी कर्तव्य निभावण्यासाठी इटलीला गेल्यानंतर इलेनोर या न्यूयॉर्क येथे स्थायिक झाल्या. त्यावेळी त्या गर्भवती होत्या. नेहमी पत्र पाठवून त्या आपल्या प्रकृतीची माहिती युद्धभूमीवर असणाऱ्या आपल्या पतीला कळवत होत्या. अखेर दुसरे महायुद्ध संपले आणि लाईल हे सुखरुप अमेरिकेला परत आले. त्यानंतर काही काळाने हे दांपत्य त्यांच्या अपत्यांसह अमेरिकेतील मियामी प्रांतात स्थायिक झाले. आजही या दोघांचे वास्तव्य तेथेच असून ते सुखी जीवत व्यतीत करीत आहेत.