बेड्या घालून 45 किलोमीटर पोहण्याचा विक्रम
मेहनत करणाऱ्यांची कधीच हार होत नाही. याचे जिवंत उदाहरण अमेरिकेतील एक जलतरणपटू असून त्याने स्वबळावर गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्याने हातात बेड्या घालून घेत अनेक किलोमीटर लांब शर्यत पूर्ण केली आहे. न्यूयॉर्कच्या 49 वर्षीय मायकल मोरोने पेलेली कामगिरी लोकांना अचंबित करणारी आहे. त्याने मॅनहॅटनच्या दक्षिणपासून पाण्यात उडी घेतली आणि हातात बेड्या असतानाच पूर्वेकडील हार्लेम नदीतून हडसन नदीपर्यंत पोहत जवळपास 28.5 मैलाचे (45.8 किलोमीटर) प्रसिद्ध ‘20 ब्रिजेस स्विम’ पूर्ण केले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याने हा पूर्ण प्रवास केवळ 10 तासांपेक्षाही कमी वेळेत केला आहे. या कामगिरीमुळे त्याने दोन विश्वविक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत.
हँडकफ परिधान करत सर्वात लांब ओपन वॉटर स्वीम आणि हातात बेड्या असतानाही न्यूयॉर्क शहराला प्रदक्षिणा घालणारा पहिला आणि सर्वात वेगवान जलतरणपटू असल्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. मोरोचे सहकारी आणि अनुभवी ओपन वॉटर जलतरणपटू पॅप्रि जटियास्मोरो यांच्यानुसार ही कामगिरी केवळ साहस नव्हे मानसिक अणि शारीरिक धैर्याचे उदाहरण आहे. ओपन वॉटर स्वीमिंग अनेकदा असे रोमांच मिळवून देते जे शब्दांमध्ये व्यक्त करणे अवघड असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मी बालपणापासून पाण्याशी जोडलेलो आहे. शाळा आणि महाविद्यालयीन दशेपासून मी अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या, परंतु मग जीवन काम आणि जबाबदाऱ्यांमध्ये व्यग्र झाले आणि सुमारे 20 वर्षांपर्यंत मी पोहण्यापासून दूर राहिलो. चाळीशी गाठल्यावर पुन्हा पाण्यात उतरलो. सोशल मीडियावर डियाना नियाड आणि रॉस एडग्ली यासारख्या ओपन वॉटर दिग्गजांना पाहून मी काहीतरी साध्य करु शकतो, असे वाटले. येथूनच अल्ट्रा मॅराथॉन ओपन-वॉटर स्विमिंग स्पर्धेची निवड केल्याचे मोरो सांगतात.